काय डेंजर वारा सुटलाय!

शिक्षण आणि आर्थिक स्थैर्य आल्यानंतर आपल्या मूल्य व्यवस्थेमध्ये काही गुणात्मक बदल अपेक्षित असतात. किमान आपले जगणे संविधानिक मूल्यावर आधारलेले असले पाहिजे, याची जाणीव कमी-अधिक प्रमाणात येणे अपेक्षित असते.

काय डेंजर वारा सुटलाय!

हल्ली एका रोगाचा प्रादूर्भाव फार मोठ्या प्रमाणात होतोय. या रोगाची साथ सबंध देशभरात वेगाने पसरतेय. कोणती साथ? अहो, भावना दुखावण्याची साथ. कोरोनाने अखिल मानवजातीला मेटाकुटीला आणले खरे, पण त्यावर आपण अखेर तोडगा काढला. पण या ‘भावना दुखावण्याच्या’ पिडेला अजून तरी खात्रीशीर उपाय सापडलेला नाही. बरे, याची कारणेही कळत नाहीत. नेमक्या कशामुळे भावना दुखावतात याचाही अंदाज सामान्य पामरांना लागत नाही.
सर्वसाधारणपणे एखाद्या जंतूचा संसर्ग झाल्यानंतर तुम्ही आजारी पडता, इथं तसंही नाही. ‘भावना दुखावण्याची’ पीडा होण्यासाठी तुमचा अमुक एका बाबाशी संपर्क, संबंध यायलाच हवा असंही नाही. कोणीतरी पोटासाठी काहीतरी खातं, आमच्या भावना दुखावतात. कोणीतरी कोणाशी सूत जमल्यावर सुखी स्वप्नांची गुलाबी स्वप्न पाहतं – आमच्या भावना दुखावतात. कोणीतरी आपल्या पसंतीचे कपडे घालून नट्टाथट्टा करतं – आमच्या….. ही यादी हवी तेवढी वाढवता येईल. वाचकांनी आपल्या अनुभवावरून ‘भा.दु.’ उदाहरणांचा वेध घ्यावा.
आता प्रश्न राहतो हे टाळायचे कसे? कोरोनाचा जिवाणू म्हणे स्वत:मध्ये बदल घडवून आणायचा. इथंही तसंच आहे. भावना कशामुळे दुखावल्या याचे काही ‘तर्कट’ मांडता येत नाही. पण तरीही या गंभीर समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी ‘भावना दुखावण्याच्या’ दुखण्याने ग्रस्त असलेल्या लोकांनी त्या कारणांची एक सूची बनवावी आणि प्रसार माध्यमांत फिरवावी. त्या सूचीचे निरीक्षण करून काही पॅटर्न सापडला तर या दुखण्यावर काही उपाय करता येऊ शकतो. कुणालाही का असेना बराच काळ दुखण्यामध्ये एकटं सोडून देणं अमानुषपणाचं लक्षण आहे.
परवा वास्कोत एक घटना घडली. उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यांनी काही विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमासाठी मशिदीत पाठविले. त्यामुळे प्राचार्यांचे निलंबन झाले. काही जणांनी याचे वर्णन ‘शिक्षण जिहाद’ असे केले. काहींनी म्हटले हे हिंदूविरोधी कारस्थान आहे. त्यामुळे याचा निकराने विरोध करायला हवा. कारण ‘हिंदू खतरे में हैं!’ वरील घटनेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करूया.. पण माझा ‘हिंदू खतरे में है।’ या विधानालाच आक्षेप आहे. कारण असे म्हणून तुम्ही देशाचे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करताय. मुघल कालखंडात ‘हिंदू खतरे में’ असणे समजून घेता आले असते. त्यानंतर ब्रिटिश व अलिकडे काँग्रेसच्या कालखंडात सर्वाधिक असुरक्षितता हिंदूंना वाटायला हवी होती. पण तसे न होता केंद्रस्थानी हिंदू संस्कृतीची ध्वजा सर्व विश्वात नेणारे व देशातील गल्लीबोळात राज्य असण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारे देशाचे पंतप्रधान असताना ‘हिंदू खतरे में हैं।’ अशी आवई उठविणे हा त्यांचा उपमर्द केल्यासारखे नाही का? यावर विचार व्हायला हवा.
आता राहिला प्रश्न कथित कार्यक्रमाचा. कुठल्याही शैक्षणिक संकुलात कुठल्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होऊ नयेत, या मताचा मी आहे. पण या कार्यक्रमाचे प्रयोजन वेगळे होते. अशा प्रकारच्या उपक्रमांची कधी नव्हे इतकी निकड वाटायला लागली आहे. आपल्या शेजारील महाराष्ट्र राज्यात अशा प्रकारचा उपक्रम राबविला जात होता, असे माझ्या वाचनात आले होते. मुस्लीम समाज हा जणू पूर्णत: जगावेगळा मानवसमूह आहे. अशा पद्धतीने वातावरण निर्मिती केली जाते. या पार्श्वभूमीवर या छोट्या का असेना प्रयत्नाचे मोल कैक पटीने वाढते. एखादी परदेशी तरुण भगवी वस्त्रे घालून संस्कृत वचने म्हणायला लागली की आपल्याला कोण आनंद होतो. असल्या व्हीडिओची शहानिशा न करता तो जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करण्यात आपल्याला धर्मकृत्य केल्याचे समाधान वाटते. मग आपल्याच देशातील बांधव (हो बांधवच, शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा आठवा!) संशयविरहीत मनाने एकमेकांना कडकडून भेटू पाहतात तर इतका आकांडतांडव कोणासाठी बरे? विद्यार्थ्यांना तक्रार केली का? पालकांनी आक्षेप नोंदवले का? याची शहानिशा नाही. हिंदूंच्या तथाकथित हितासाठी आम्ही गोंधळ घालणार. कुणावर तरी अन्याय झाला अशी हाकाटी पिटणार, कथित पीडित लोकांचे वकीलपत्र घेणार आणि शेवटी आपणच न्यायाधीश बनून आपल्या मनाला येईल त्याला गुन्हेगार ठरवून शिक्षण देणार. या प्रकरणात तरी वेगळे काय घडले? शेवटी प्राचार्यांना आपले म्हणणे मांडू न देता निलंबित व्हावे लागले.
निलंबित झालेला प्राचार्य हिंदूच आहे बरे! महात्मा गांधी स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवून घेत. त्यांचे अवघे जीवन हिंदू धर्मातील आदर्श मूल्ये प्रतीत करणारे होते. त्यांना नथुराम गोडसे (यांचा काही जणांना पुळका आहे) यांनी संपविले, कारण काय? तर देश व हिंदू हिताकरिता देशाची विभागणी जिनांच्या हट्टापायी झाली, पण नथुरामने खून मात्र गांधीजींचा केला. एका थोर सनातती हिंदू पुढाऱ्याचा खून हिंदू हिताकरिता केला. वरील वाक्यातील विरोधाभास शालेय स्तरावरील विद्यार्थीसुद्धा ओळखू शकेल, पण प्रौढांना हे उमगत नाही. कारण आम्हाला समजून घ्यायचेच नाही. उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्राचार्य काही आमच्यासारखा ‘लिब्रांडू’, ढोंगी सेक्युलर नाही. त्यांनी आतापर्यंत हिंदूंंच्या अनेक कार्यक्रमांना विद्यालयात परवानगी दिली आहे. आपल्या धर्माचे सण, कार्यक्रम साजरे करत असताना दुसऱ्या धर्माचा द्वेष, तिरस्कार करण्याची त्यांना कधी गरज वाटली नाही. (गांधी, विनोबांचा हिंदू विचार असाच आहे.) उलट आपल्या संस्कृतीतील अद्वैताचा धागा त्यांनी पकडला. म्हणून आजूबाजूला द्वेष, संशयाचे वातावरण असताना आपल्या विद्यार्थ्यांना संवादासाठी सन्मुख केले. पण काहींच्या मते हाच अपराध आहे. आपल्या धर्माचे प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्हाला कुठल्यातरी धर्माचा द्वेष केलाच पाहिजे. तरच तुमचे धर्मप्रेम काही जणांच्या मताने खरेखुरे ठरते. प्राचार्यांचा अपराध घडला तो हा ‘मशिदीतील कार्यक्रमाचे निमंत्रण घेऊन आलेल्या आपल्याच माजी विद्यार्थ्यांना त्यांंनी शिव्या घालून हाकलवून लावले नाही.’ शेवटी निलंबनाचे पत्र घेऊन घरी बसावे लागले. आपल्या समाजाची न्यायव्यवस्था हुल्लड करणाऱ्या १५-२० लोकांकडे गेली आहे का? त्यांंनी हवे ते करावे व आपल्याला हवे ते पदरात पाडून घ्यावे. दुर्दैवाने याचे उत्तर ‘हो’ असे आहे. असले प्रकार सर्रास व राजरोस होत आहेत. कारण आपल्याकडील सुशिक्षित मध्यमवर्गीयांचा या मंडळींना मूक पाठिंबा आहे. समाजातील मोठ्या वर्गाला यात काही गैर आहे असे वाटत नाही. यानिमित्ताने आपल्या समाजातील थोर मध्यमवर्गीयांच्या बाबतीत काही काही निरीक्षणे नोंदवाविशी वाटतात.
शिक्षण आणि आर्थिक स्थैर्य आल्यानंतर आपल्या मूल्य व्यवस्थेमध्ये काही गुणात्मक बदल अपेक्षित असतात. किमान आपले जगणे संविधानिक मूल्यावर आधारलेले असले पाहिजे, याची जाणीव कमी-अधिक प्रमाणात येणे अपेक्षित असते, आपल्या जगण्यामध्ये घडून आलेल्या बदलांचा लाभ इतर वंचित घटकांना मिळावा यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपले योगदान देणे अपेक्षित असते. भोवतालच्या तत्कालीन गोष्टींचा प्रभाव पडू न देता पुरोगामी भूमिका समाज जीवनात वठवावी, अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे नाही. पण आपला मध्यमवर्गीय काही अपवाद वगळता हे करताना दिसतोय का? किती जणांना आपल्या बालपणातील शाळा सुधारावी असे वाटते? त्यापेक्षा आपल्या गावातील मंदिराचा जीर्णोद्धार करणे श्रेयस्कर वाटते. आपल्या देशात गेल्या काही वर्षात जितक्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्यापेक्षा आपल्या मनाचा जीर्णोद्धार केला असता तर…
दुसरे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे, भूतकाळाविषयी अपार प्रेम! प्रेम हे आंधळे असते किंबहुना आंधळेपणानेच प्रेम करता येते, अशी आपली ठाम समजूत आहे. त्यामुळे ऐतिहासिक घटनांच्या परिप्रेक्षातून वर्तमानाकडे पाहात भविष्याची स्वप्ने रंगवणे हा आपला फावल्या वेळासाठी उद्योग बनला आहे. मग कुठलाही नेत्याला खलनायक बनवणे, त्यांच्यात नसलेली भांडणे लावणे, इतिहासाची मोडतोड करून आपल्या मनातला इतिहास खरा इतिहास म्हणून व्हॉटसॲप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जगाला शिकवत राहणे यात आपण तरबेज बनलो आहोत.
तिसरे लक्षण – आपली जात, समूह, धर्म याचा कडवा अभिमान बाळगणे. इतकेच नव्हे तर कुठल्यातरी समूहाला आपले शत्रू समजणे गरजेचे आहे, असे वाटू लागले आहे. सतत त्या समूहाविषयी घाणेरडे बोलणे, त्यांच्याविषयी संशयाचे धुके गडद कसे होईल याची काळजी वाहणे म्हणजे आपली जात, समूह, धर्म आदीविषयी अभिमान बाळगणे. तुमच्या समाज जीवनातील कर्तव्यदक्षतेचे हे व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. इतिहासात हिटलरने असेच केले होते. ज्यूंविषयी असाच द्वेष जर्मन लोकांच्या मनात भरला. त्याचा गोबल्स नावाचा सहकारी एखादे असत्य १०० वेळा लोकांच्या माथी मारायचा, जेणेकरून त्या समूहासाठी ते सत्य बनावे. पुढील इतिहासाची उजळणी करायची गरज नाही. त्या जर्मन देशाने हिटलरच्या पाशवी वृत्तीचे अवशेष जपून ठेवले आहेत. जेणेकरून सर्व जगाने त्यातून धडा घ्यावा पण आपण तर विश्वगुरू होणार आहोत! आपल्या गुरुचे काम ज्ञान घेण्याचे नाही तर इतरांना धडे गिरवायला देणे आणि यदा कदाचित धडे गिरवायला कोण टंगळमंगळ करत असेल तर त्यांना धडा शिकवणे हे आपले कर्तव्य आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असं म्हणतात. पण आपल्याला भलतीच घाई झालेली दिसते.
या पार्श्वभूमीवर भारताचे संविधान बनविणाऱ्या विद्वानांविषयीचा आदर कैकपटींनी वाढतो. भवतालच्या धर्मविच्छादाचा कुठलाही असर तत्कालीक होऊ न देता उलट त्यातून धडा घेत उच्च व प्रगत मानवी मूल्यांवर भारत संविधानाची निर्मिती केली. आपणाला मात्र इतिहासाचा चिखल तुडवायला भारी मौज वाटते.
कोरोनाच्या काळात रक्ताची नाती पातळ झालेली पाहिली. पण त्याचवेळी ‘हे विश्वची माझे घर’ म्हणणारे संत ज्ञानेश्वर आपल्या सगळ्यांसाठी वंदनीय आहेत. ते पसायदानात ‘भूतां परस्परें जडो मैत्र जीवांचे’ असा आशावाद व्यक्त करतात. त्यांना मैत्र केवळ माणसांचे अभिप्रेत नाही तर समस्त जीवसृष्टीत सौहार्दाचे वातावरण हवे आहे. ज्ञानेश्वरांच्या या आणि अशा कितीतरी अमृत ओव्यांंचे रसग्रहण करताना आपल्याकडील प्रवचनकार थकत नाहीत, पण याच विचारांना काळीमा फासणारे वर्तन होत असताना आपल्याकडील ह.भ.पं. ना त्याचा उच्चार करावासा वाटत नाही. याच प्रवृत्तीच्या लोकांसाठी कदाचित तुकारामांनी म्हटले असेल,
तुका म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी।
एकतरी ओवी अनुभवावी।।
आपण स्वातंत्र्य हे जीवनमूल्य मानत असू तर आपल्या धर्म, जमात, जात यांच्या टोळ्या करून राहण्याचे सुद्धा काही जणांचे स्वातंत्र्य मान्य करायला हवे. ज्यांना ‘भेद’ हेच जीवनमूल्य वाटत असेल त्यांनी आपल्या कुंपणाच्या तटबंदी आकाशाला भिडवाव्यात आणि त्यात सुखनैव दिवस काढावेत. सर्वसामान्य, सुबद्ध नागरिकांनी यांचे अनुकरण का करावे? आमच्या स्वातंत्र्याची मक्तेदारी यांना का द्यावी?
फार मागे उर्दू कवी कैफी आझमी यांची कविता वाचली होती. त्याचा भावानुवाद असा होता.
‘आमच्यावरच जुलूम होत आहे
आणि आम्हालाच गुन्हेगार बनवले जाते आहे.
ज्यांना मेल्यानंतरही पळायचे नव्हते
त्यांना जिवंत जाळण्यात आले.
आम्ही आमचे घर बांधण्यासाठी सारे जीवन खर्ची घालतो
आणि ही माणसे काही तासातच वसाहती उजाड करतात,
यापेक्षा पक्षी बरे… जे कधी मंदिराच्या कळसावर
कधी मशिदीच्या घुमटावर तर कधी चर्चच्या इमारतीवर जाऊन बसतात.’
प्राण्यांना हौसेने पाळणारे आपण प्राणी जे मूल्य सहजगत्या पाळतात, ते मूल्य पाळण्यात आपल्याला एवढी यातायात का पडावी? हे कठीण आहे? निश्चितच नाही.

– कुलदीप अशोक कामत

Your email address will not be published. Required fields are marked *