एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ

अरुल मेरी आणि आयव्हन फर्नांडीस… अरुल मेरी ही पुदुच्चेरी राज्यातील आठवी इयत्तेतील विद्यार्थिनी. आयव्हन हा स्पेन देशातील एक आघाडीचा धावपटू. एका लांब पल्ल्याच्या जागतिक स्पर्धे दरम्यान आयव्हनच्या पुढे फक्त एकच स्पर्धक होता. अंतिम रेषा एकदम जवळ आली होती. त्याच्या पुढे असलेल्या आबेल मुताई या धावपटूला सहज मागे टाकून स्पर्धेत प्रथम येण्याची नामी संधी आयव्हन समोर होती. पण आयव्हनने त्या संधीचा फायदा घेण्याचे टाळले. स्पर्धेत तो दुसरा आला. मिळालेली संधी का दवडलीस असा प्रश्न पत्रकारांनी त्याला विचारला तेव्हा त्याने सांगितलेले उत्तर आजही करोडो लोकांसाठी प्रेरणा आणि आदर्श देणारे आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकावर आबेलचा अधिकार होता. तो मी त्याला मिळवून दिला. आज मी प्रथम बक्षीस घेउन घरी गेलो असतो तर माझ्या आईला ते आवडले नसते. ती मला नेहमी सांगते, प्रामाणिकपणा एका पिढीतून दुसऱ्या पिढी पर्यंत पोहोचायला हवा आणि तो पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून आबेल या स्पर्धेतील खरा विजेता आसताना मी त्याच्या गैरसमजाचा फायदा घेउन पहिला क्रमांक मिळविला असता तर माझ्या आईला ते आवडले नसते. आयव्हनची आई ही जगातील एक आदर्श माता आहे. त्याचे झाले होते असे की या स्पर्धेत आधी पासून आघाडीवर असलेल्या आबेलची अंतीम रेषेच्या अगदी जवळ पोहोचल्यावर आपण ती अगोदरच ओलांडली असल्याचा गैरसमज झाला होता. याच गैरसमजातून आपली गती त्याने कमी केल्यामुळे त्याच्या मागोमाग असलेला आयव्हन सहज त्याला ओलांडून पुढे जावू शकला असता. पण आबेलचा गैरसमज झाल्याचे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने आपल्या स्पॅनीश भाषेत त्याला ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला पण आबेलला स्पॅनीश भाषा येत नसल्याने त्याचा काहीच फायदा झाला नाही. अश्या वेळी आयव्हनने अक्षरशा आबेलला मागून धक्का देत अंतिम रेषेच्या पुढे ढकलले आणि मगच आपण अंतिम रेषा पुर्ण केली. आयव्हन आज जगभरातील कित्येकांचा आदर्श आहे हे सांगायची काही गरज नाही.

अरुल मेरी ही यंदा पुदुच्चेरीतील कराईकल या गावातील एका खाजगी शाळेत आठवीत शिकते. नुकत्याच झालेल्या परिक्षेत ती वर्गात दुसऱ्या क्रमांकाने पास झाली. त्यावर तिची आई व्हिक्टोरिया हिने अशी काही कृती केली ज्यामुळे यापुढे आपली मुलगी वर्गात नेहमीच पहिल्या क्रमांकाने पास होणार. तिने शाळेतील चौकिदाराकरवी वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तिर्ण झालेल्या बाला मणिकंदन या विद्यार्थ्याला शितपेयाच्या दोन बाटल्या पाठवून दिल्या. त्या प्यायल्यावर बाला बेशुद्ध पडला आणि रुग्णालयात औषधोपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. वयाची पंधरा वर्षे सुद्धा पार न केलेला बाला जिवघेण्या स्पर्धेतून निर्माण झालेला मत्सर, अहंकार, असुयेचा बळी ठरला. अश्या प्रकारे मिळविलेला हा क्रमांक निरपराध मेरीला जिवनात आनंद मिळवून देवू शकेल का याचा विचार तिच्या आईने करायला पाहिजे होता.

दुसरा क्रमांक मिळाला तरी हरकत नाही परंतू संस्कार महत्वाचे असे मानणारी आयव्हनची आई आणि माझी मुलगी पहिलीच आली पाहिजे मग त्यासाठी कुणाचा जीव घ्यायची गरज पडली तरी हरकत नाही असे मानणारी मेरीची आई. इथे दोन आईंचा उल्लेख आला आहे तो फक्त योगायोग. या दोन्ही आया म्हणजे आई तसेच वडिलांचेही प्रतिनिधी. व्हिक्टोरियो असो वा व्हिक्टर फरक काहीच नाही!

आज पालकांना आपला मुलगा किंवा मुलगी उच्च क्रमांकाने पास झालेली हवी असतात. जून मध्ये दहावीचा निकाल लागला आणि एका मुलीचे आई- वडील मला भेटायला आले. म्हणाले, मुलीने नाक कापले. नेहमी वर्गात तिसरा क्रमांक यायचा, या वेळी नेमका अंतिम परिक्षेत पाचवा क्रमांक आला. मी त्याना त्यांच्या मुलीकडून त्यानी पालक म्हणून किती टक्क्यांची अपेक्षा ठेवली होती हा प्रश्न विचारला. त्यानी नव्वद टक्के म्हणून उत्तर दिले. त्यांच्या मुलीला चौऱ्याण्णव टक्के गूण मिळाले होते. अपेक्षे पेक्षा चार टक्के जास्त. त्यासाठी मुलीला शाबासकी देण्या ऐवजी तिचा तिसरा क्रमांक चुकला म्हणून दोघेही पालक तिला दोष देत होते. मुलांच्या शैक्षणिक विकासात क्रमांक महत्वाचा नसतो तर त्यांची गुणात्मक वाढ नेहमीच महत्वाची असते हे पालकांनी लक्षात ठेवायला नको काय?

परिक्षा असो किंवा एखादी स्पर्धा, मुलांना जेव्हा मोकळेपणाने कसल्याच दडपणा शिवाय भाग घेण्याचे वातावरण मिळते तेव्हा ती आपल्या क्षमतेपेक्षाही चांगले प्रदर्शन करू शकतात हे अनेकदा अनुभवातून सिद्ध झालेले आहे. दडपणा मुळे आत्मविश्वास ढळतो आणि त्याचा परिणाम कामगिरीवर होतो. पालकांच्या बक्षीस किंवा उच्च क्रमांकाच्या दडपणामुळे मुलांची अभ्यास किंवा त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याविषयीची आवड कमी होते आणि त्यातून त्याना बर्‍याचदा नैराश्य येण्याची शक्यता असते. अशी मुले मग ते क्षेत्रच सोडून देतात असा अनुभव आहे.

जगभरातील कित्येक महत्वाचे शोध शाळांतील नापासांनी लावलेले आहेत. आयुष्यात कधीच बक्षीस न मिळालेली मुले भविष्यात पुढे जाउन जगातील यशस्वी व्यक्तिमत्वे बनल्याची कित्येक उदाहरणे आहेत. आणि या उलट शाळेत प्रथम क्रमांक मिळविणारी मुले भविष्यात त्या त्या क्षेत्रापासून कोसो दूर गेलेली अनेक उदाहरणे आहेत.

आजच्या काळात स्पर्धेची व्याख्या बदललेली आहे. संत तुकाराम महाराजानी सांगितलेल्या ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या वचनाप्रमाणे प्रत्यक्षात वागण्याची वेळ आज आपणा सर्वांवरच आलेली आहे. महामारीने आम्हाला जगणे सुसह्य होण्यासाठी आपसातील स्पर्धेची नव्हे तर एकमेकांच्या सहकार्याची किती गरज असते हे दाखवून दिलेले आहे. कोवीड काळात मुलांच्या मानसिकतेवर खूप मोठा परिणाम झालेला आहे. प्रचंड प्रमाणात नकारात्मकता, नैराश्य, आळस त्यांच्या वागण्यात दिसून येत आहे. अश्या वेळी स्पर्धा आणि त्यातून क्रमांकासाठी निर्माण होणारा दबाव, बक्षीस न मिळाल्यास त्यातून येणारे नैराश्य या गोष्टी मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने घातक आहेत. एकमेकांना मदत केली तर दोघांचाही उत्कर्ष होतो ही भावना मुलांमध्ये रुजवणे ही काळाची गरज आहे. स्पर्धा आणि क्रमांका पेक्षा मुलांना एकामेकांच्या सहकार्यातून आणि प्रोत्साहनातून आपले व्यक्तिमत्व घडविण्यास प्रेरीत करणे गरजेचे आहे. तसे झाले तरच कोवीड नंतर तयार झालेली परिस्थिती लवकर पूर्वपदावर येण्यास मदत होईल. त्या साठी आम्हा सर्वांनाच आयव्हन फेर्नांडीजच्या आईचा आदर्श समोर ठेवावा लागेल…

Your email address will not be published. Required fields are marked *