वृद्धत्वाकडे पोचलेला गोव्यातीाल एकेक वरिष्ठ पत्रकार काळाच्या पडद्याआड जातोय आनी त्यातून एकेक इतिहासाचा साक्षीदार गडप होतोय. मुक्त गोव्यातील हा फारच महत्वाचा काळ आहे. कारण इतिहासाच्या या साक्षीदारांच्या उदरात कित्येक गुपिते दडली आहेत. ती त्यांनी लिखित वा दृकश्राव्य स्वरुपात डॉक्युमेंट केली नाहीत तर ती गुपितेच राहतील आणि मुक्त गोव्याचा इतिहास कित्येक विदारक सत्यांना मुकेल. परवाच गुरुदास उर्फ आमचे सर्वांचे काका सिंगबाळ गेले आनी ही गोष्ट जास्तच प्रकर्षाने जाणवली.
वयाच्या 83 व्या वर्षी प्राणज्योत मालवलेल्या काकांची 37 वर्षांची गोव्याच्या फिल्डवरील पत्रकारितेची कारकीर्द ही नुसती कारकुनी खर्डेघाशी नव्हती. पदवीधर झाल्यावर 1963 मध्ये तेव्हाच सुरू झालेल्या ‘द नवहिंद टाइम्स’ या इंग्रजी वृत्तपत्रातून वयाच्या अवध्या 24व्या वर्षी त्यांनी पत्रकारितेत पाऊल टाकले होते. फार नशिबवान होते ते. कारण त्यावेळी वृत्तपत्रे होती इनमीन चार. ‘ऊ हेराल्डो’ व ‘आ व्हिदा’ ही पोर्तुगीज, ‘गोमंतक’ हे मराठी व ‘द नवहिंद टाइम्स’ हे एकमेव इंग्रजी वृत्तपत्र. त्यामुळे गोव्यातील गल्लीपासून दिल्लीपर्यंत ‘नवहिंद’चा दबदबा होता. आणि काका होते पणजीतील एक प्रमुख रिपोर्टर.
केवळ 1963 मधील पहिल्या गोवा विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनचेच नव्हे तर 1963 मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीचेही वार्तांकन त्यांनी केले होते. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंपासून सगळ्याच राष्ट्रीय पातळीवरील मातब्बर राजकारण्यांना त्यांनी जवळून अनुभवले होते. गोव्यातील राजकीय पक्षांतील, औद्योगिक संस्थांतील वा इतर सामाजिक-सांस्कृतीक संस्थांतील अंतर्गत बातम्या व सर्वच राजकारण्यांचे, अर्थतज्ञांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे व लेखक-कलाकारांचे अंतर्मन त्यांना ठाऊक होते. 14 वर्षांनंतर स्वतंत्र भारतात विलीन झालेल्या गोव्यासमोरील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आव्हाने तत्कालीन मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकारांनी कशी झेलली वा त्यात डॉ जॅक सिक्वेरासारख्या तेवढ्याच विद्वान विरोधी पक्ष पुढाऱ्यांची भुमिका कशी विधायक होती या गोष्टी कुणीही काकांकडून ऐकाव्यात.
काका मितभाषी होते तेवढेच साधे व सरळ वृत्तीचे. तरुण पत्रकारांसोबत बसून ‘काणी’ सांगितल्याप्रमाणे ‘गजाली’ सांगणे त्यांना फार आवडे. त्यांनी कधीही ‘मी यंव केले आणि त्यंव केले’ असा बडेजाव मिरवला नाही वा ‘कितें रे हे कालपयरचे भुरगे’ अशा शब्दांत आमची भलावणही केली नाही. त्यामुळे पणजी सचिवालयातील प्रेस रूममध्ये गेल्यावर आम्ही आपसूकच काकांभोवती घोटाळायचो. ‘यू सी’ म्हणत इंग्रजीमध्ये शांतपणे आपला मुद्दा मांडत बोलणे ही काकांची खासियत. आक्रस्ताळेपणा करीत बोललेले आम्ही त्यांना कधीही पाहिले नाही. त्यांमुळे सिनियरांमध्ये वर्तमान स्थितीवर चाललेल्या गजालींवेळी आम्ही काकांचे बोलणे कान देऊन ऐकत असू. कधी त्यांना वेळ मिळाला तर 60 आणि 70 च्या गोष्टीही त्यांना सांगायला भाग पडत असू. त्याकाळात पत्रकारितेच्या शाळा नव्हत्या वा डिप्लोमा वा डिग्र्याही नव्हत्या. होत्या त्या काकांसारख्या चालत्या-बोलत्या शाळा. त्यातूनच शिकत आम्ही थोडीबहुत पत्रकारिता करायला शिकलो. आज तोच प्रेस रूम ओस पडलाय म्हणून तर गोव्याची पत्रकारिता अज्ञानाच्या गर्तेत गटांगळ्या खात आहे.
‘नवहिंद टाईम्स’मधून काका ‘द वेस्ट कोस्ट टाइम्स’ मध्ये गेले. मडगावातून निघणारे हे एक अप्रतिम वृत्तपत्र दुर्दैवाने लवकरच बंद पडले व काकांनी निवृत्त होईपर्यंत ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे गोवा प्रतिनिधी म्हणून काम केले. आणि नंतर पत्रकारितेच्या शाळांतून शिक्षक म्हणूनही त्यांनी आपले अनुभव नव्या पिढीपर्यंत पोचवले. बदलते तंत्रज्ञानही त्यांनी सहजगत्या आत्मसात केले. काका फेसबूकवर होते, त्यांचे ट्विटर हँडल होते. मात्र ते अत्यंत सक्रीय होते ते व्हॉट्सअॅपवर. मुद्देसूदरित्या एखाद्या गोष्टीचे विश्लेषण करून ठोस दृष्टिकोणातून प्रश्र्न विचारणे यात काकांचा हातखंडा होता. उगाचच आवाज चढवणे, भांडखोर पद्धतीने वाद घालणे, केवळ नकारात्मक वृत्तीचे प्रदर्शन करीत पुढच्या व्यक्तीला नामोहरम करणे असल्या अतिरेकी गोष्टी पत्रकार म्हणून काकांनी कधीच केल्या नाहीत. ‘सॉफ्ट-स्पोकन’ होतेच ते, पण तेवढेच ‘आवट-स्पोकन’ही होते. शांतपणे विचारलेल्या त्यांच्या ‘स्ट्रेटफॉरवर्ड’ प्रश्र्नाला उत्तरे देताना भलेभले राजकारणी अक्षरशः गांगरून जायचे. पण म्हणून कधीच कुणाही राजकारण्याला वा इतरही क्षेत्रातील बुजुर्गांना ते आपले शत्रू वाटले नाहीत. नाते मित्रत्वाचेच राहिले. तोच कित्ता शक्य होईल तेवढा गिरवण्याचा मग आम्हीही प्रयत्न केला. पण काकांसारखा तो कधी जमलाच नाही.
जाता जाता काका पत्रकारितेतली पुढच्या पिढ्यांसाठी ‘माय डेज इन जर्नलिजम’ हे छोटेखानी पुस्तक ठेऊन गेलेत. त्यात त्यांनी लिहिलेल्या काही ऐतिहासिक घटना, स्पष्टवक्तेपणाने मांडलेली मते, काही मजेशीर प्रसंग आणि प्रामाणिकपणे आयुष्य जगणाऱ्या पत्रकाराच्या निवृत्तीनंतरच्या व्यथा यांचा हा खजिनाच आहे. काकांनी कधीच कुणाची हांजी हांजी केली नाही, कुणापुढेही लाळ घोटली नाही, आपल्या पदाचा गैरवापर करून आपला स्वार्थ साधला नाही वा कधी आपल्या बुजुर्ग होण्याचा बडेजावही मिरवला नाही. हल्लीच कोविड काळापूर्वी विधानसभा अधिवेशन चालू असताना एकदा टीव्हीवर मी आजची व कालची विधानसभा व भाऊ व जॅक सिक्वेरा या विषयांवर त्यांची घेतलेली मुलाखतही तेवढीच उद्बोधक आहे. यू ट्यूबवर मुद्दाम पहा. तुम्हालाच त्याची प्रचिती येईल. म्हणूनच तर ‘डॉ टी बी कुन्हा जीवनगौरव’ या गोव्यातील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कारास ते पात्र ठरले. त्यांचे समवयस्क त्यांना ‘गुरू’ म्हणूनच हाक मारीत. आम्ही त्यांना काका म्हणू. परंतु खऱ्या अर्थाने ते आमचेही तेवढेच ‘गुरू’ होते. पत्रकारितेतील एक आदर्श ‘गुरू’!