संजय सर गेला… मी ‘गेले’ म्हणणार नाही. म्हटले तर त्याला आवडणार नाही. अगदी नातवंडांसमवेतसुद्धा त्यांचा मित्र बनून त्यांना खिदळवणाऱ्या सत्तरीतल्या लहान मुलाला ‘तुम्ही’ म्हणायचं? आम्ही सगळे त्याला संजय सरच म्हणायचो. खरे म्हणजे संजय सssर. तेसुद्धा त्यानंच एकदा सांगितलेल्या परदेशात काम करणाऱ्या त्याच्या एका विद्यार्थ्यावरच्या विनोदी किश्श्यावरनं. आम्हा सर्वांशीच हसत-खेळत वागणारा संजय सर गेली कित्येक वर्षे आपल्या ह्रदयविकाराशीही खेळतच होता. हसत-खेळत मरण यावं हे त्याचं स्वप्न होतं. ते पूर्ण करूनच गेला. अचानक गेला खरा. पण आपल्या कुटुंबियांशी विनोद करता करताच छातीत कळ येऊन त्यानं आपला या भूतलावरील प्रवास संपवला. त्याच्या या नाट्यमय एक्झिटमुळं आमच्या छातीत आलेली कळ मात्र जाता जात नाही. ती जाणारही नाही. आयुष्यभर सुन्न करीत राहणार हे नक्की.
संजय सर होताच तसा अवलिया. जेवढा विनोदी तेवढाच गंभीर वृत्तीचा. अंगावर आलेली कोणतीही जबाबदारी त्यानं थट्टेवारी नेली नाही. अगदी विनोदसुद्धा. जे न देखे रवि, वह देखे कवी म्हणतात. हा तर कवीच्याही पुढचं बघायचा. कमालीची निरीक्षण शक्ती. त्यातनं अचूक कोणाच्याही व्यंगावर बोट ठेवायचा. आणि ज्याच्यावर विनोद केलाय तोसुद्धा खोss करून हसत सुटायचा. येता जाता त्याला विनोद सुचायचे. शब्दांच्या कोट्या करण्यात तर बहाद्दर. त्यात त्यानं वर्षश्राद्धानिमित्य पंगतीत बसल्यावेळी आपल्या दिवंगत वडिलांनासुद्धा सोडलं नव्हतं. कुटुंबातल्या कुणी तरी त्याला सांगितलं, “आरे संजय, बाबाच्या पानार फूल घाल.” “कितें? जितो आसतना हाफ पासून घेतलो ना. आनी आतां फुल्ल घाल म्हणटा?” सगळी पंगत खो खो करीत हसत सुटली. कधीच बिलो द बॅल्ट विनोद केले नाहीत. उलट त्याच्या प्रत्येक विनोदात एक गंभीर स्वरुपाचं व्यंग लपलेलं असायचं. हसून हसून पोट फुटल्यावर आम्ही त्याचा विनोद परत आठवायचो तेव्हा आपसूकच गंभीर बनायचो. त्याच्या विनोदाला कधी वेदनेची झालर असायची, तर कधी कटु सत्याची. ह्युमर इज अ ब्लडी सिरियस बिझनेस हे त्याला पक्कं ठाऊक होतं. चार्ली चॅप्लिनचा जणू शिष्यच.
गेल्याच वर्षी त्यानं गोमंत विद्या निकेतनमध्ये स्वतःवरच तासाभराची स्टँड अप कॉमेडी केली होती. स्टँड अप कसली? वॉकिंग टॉकिंग कॉमेडीच होती ती. लहानपणासून आतापर्यंतचं आपलं सगळं आयुष्य आमच्यापुढं उभं केलं. तेही स्वतःवरच दिलखुलास विनोद करीत. शिवाय पुढं बसलेल्या आपल्या मित्र-मैत्रीणींवर आणि आपल्या दिवंगत शिक्षकांवरसुद्धा. कुणाला म्हणजे कुणाला सोडला नाही. भास्कर नायक आणि दत्ता नायकांसारख्या आपल्या वर्गमित्रांना आणि आपल्या बायकोला तर अजिबातच नाही. त्यांचीही व्यंगं काढली आणि आपलीही अक्षरशः नग्न बनून जगासमोर मांडली. अगदी बिनधोकपणे. कसलीही लाजलज्जा न बाळगता. गंभीर स्वरुपाच्या व्यंगात्मक विनोदाचा सर्वोत्कृष्ट नमुनाच होता तो. मनोशोभा कलाघरामध्ये संजय सर आणि राजय पवाराची विनोदी जुगलबंदी करण्याचं आम्ही ठरवलं होतं. ते मात्र राहूनच गेलं.
माझा आणि त्याचा जवळचा संबंध आला तो मी ‘सुनापरान्त’चा संपादक झाल्यावर. रविवारच्या पुरवणीत मला एक संपूर्ण पान विनोदी स्वरुपाचं काढायचं होतं. किमान चार-पाच स्तंभलेखकांना घेऊन. त्यात संजय सरानं मला एक वेगळ्याच प्रकारचा स्तंभ दिला. नाव होतंः “ट्राय ईटः वन फॉर द रोड”. ईट म्हणजे खाण्यातलं ईट (Eat). खाणजेवण बनवायचं कसं यावर चिक्कार स्तंभ असतात. मात्र संजय सरानं स्तंभ दिला तो खावं वा प्यावं ‘कसं’ यावर. अगदीच भन्नाट. म्हणजे खाण्याची वा प्यायची मजा ही केवळ ते कसं बनवलंय यावरच नसते, तर त्यावेळचं वातावरण कसं असावं आणि कोणत्या वातावरणात काय खावं-प्यावं यावर तो अशा पद्धतीने लिहायचा, की वाचणारा अक्षरशः मिटक्या मारीत वाचायचा. अगदी मुसळधार पावसात काय खावं आणि घामाच्या पागोळ्या वहाणाऱ्या उकाड्यात काय प्यावं याची मजा चाखायची असेल तर त्यानं त्यावर त्या स्तंभांचं ‘घोस्त’ हे पुस्तक काढलं ते आजही विकत घेऊन वाचावंच. म्हणूनच तर त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती अक्षरशः एका आठवड्यात संपली होती. त्यानंतर ‘भूस बरो दीस बरो’ हेही पुस्तक तेवढंच गाजलं. आज विद्यापीठ आणि महाविद्यालयातली मुलंही शिकतायत ती त्यासाठीच.
पण म्हणून संजय सर हा केवळ विनोद करणारा जोकर बिलकुल नव्हता. ‘सुनापरान्त’नं जेव्हा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सुनापरान्त टीचर’ या प्रश्र्नोत्तरांच्या विषयवार पुस्तिका काढण्याचं ठरवलं तेव्हा सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन गोव्यातले उत्तमोत्तम शिक्षक त्यानं मला मिळवून दिले होते. कारण तो स्वतःच एक हाडाचा शिक्षक होता. तोसुद्धा भौतिकशास्त्रासारख्या किचकट विषयाचा. पण त्याचे विद्यार्थी सांगतात त्याप्रमाणं तो विषय अशा नाट्यमय पद्धतीनं शिकवायचा, की फिजिक्सचा तास हा विद्यार्थ्यांसाठी पर्वणी असायची. E=mc2 हा रिलेटिव्हिटीचा सिद्धांत शिकवण्याची त्याची पद्धत बघितल्यास खुद्द आल्बर्ट आइन्स्टाईन्ससुद्धा थक्क होईल. नाट्यमय पद्धतीनं रोल प्ले करून कोणताही विषय शिकवावा हे नव्या शैक्षणिक धोरणातनं आज शिक्षकांना सांगावं लागत आहे. पण संजय सराची 80 आणि 90 मधील सगळी शैक्षणिक कारकीर्द याच पद्धतीनं शिकवण्यात गेली. मुळात तो बोलायचासुद्धा नाट्यमय पद्धतीनं. बोलण्यातले चढउतार व स्वरातली लवचिकता एकदम लाजवाब. नाटक त्याच्या धमन्यातनं वहात होतं. आणि एक संस्थापक वडील असलेलं केपेचं होली क्रॉस स्कूल हे त्याचं दुसरं घर झालं होतं. आधी विद्यार्थी म्हणून आणि नंतर शिक्षक व मुख्याध्यापक.
नाटक हा संजय सराचा स्थायीभाव होता. उच्च शिक्षण खात्याचे संचालक म्हणून निवृत्त झालेले माझे कॉलेजमधले शिक्षक भास्कर नायक व संजय सर हे होली क्रॉसपासूनचे जिवलग मित्र. विनोदी धाटणीत एकामेकांचा उद्धार करीत जीवाला जीव देणारी त्यांची निर्मळ मैत्री बघतच आम्ही घडलो. होली क्रॉसच्या शाळेत, चौगुले कॉलेजमध्ये आणि नंतरही त्यांनी कित्येक एकांकिका आणि नाटकं सोबत गाजवली. भास्कर सरांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास संजयनं भुमिका केली आणि राज्य पातळीवर अभिनयाचं पहिलं बक्षीस पटकावलं नाही असं कधी झालंच नाही. आम्हाला मात्र कधीमधी प्रशस्तीपत्रकं तेवढी मिळायची. मी कॉलेजात असताना या दोघांनी केलेली रवीन्द्र केळेकारांची ‘मुक्ती’ ही एकांकिका पाहिलेली आजही डोक्यातनं जात नाही. त्यात भास्कर सरांच्या भुमिकेला लांबलचक स्वगतं होती. आणि संजय सराची भुमिका केवळ गप्प बसून ऐकायची. तो संजय सर बघून नाटक म्हणजे ॲक्टिंग नव्हे, तर रिॲक्टिंग हा अभिनयातला पहिला धडा मिळाला होता. केपेमधल्या देऊळमळावरची नाटकं म्हणजे तर रिवणपासून सावर्डे व गुडी-पारोडापर्यंतच्या रसिकांसाठी पर्वणीच असायची. महाराष्ट्रातल्या कंपनीचं नाटक येऊन गेलं की मग ते घेऊन संजय सराने देऊळमळाचा वार्षिक रंगमंच गाजवलाच म्हणून समजा. नंतर राजेंद्र तालकांच्या बहुतेक सर्वच सिनेमांमध्ये संजय सर छोट्या-मोठ्या भुमिकांमध्ये हमखास असायचा. कार्मेल कॉलेजमध्ये शिकवणारी व महाराष्ट्रातून आलेली त्याची सहचारिणी मंजुषासुद्धा त्यानं ‘पाहिजे जातीचे’ म्हणत त्याच नाटकाच्या तालम्यांवेळी जातिवंत प्रेमवीर बनून पटकावलेली.

आता संजय सर नसणार. कुठंही गेलं तर वातावरण केवळ गंभीरच असणार. ते उल्हासित बनवणारं कुणी नसणार. अचूक वर्मावर बोट ठेवीत दिलेल्या प्रतिक्रियेतनं खुक्क करून येताजाता हसवणारंही कुणी नसणार. सगळ्या ओल्या पार्ट्या ड्राय होणार. सगळी गेट-टुगेदर्स नीरस असणार. कटु सत्यसुद्धा विनोदातनं सांगीत एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू आणणारा आमचा चार्ली चॅप्लिन परत कधीच दिसणार नाही हा नुसता विचारच ह्रदयात खड्डा खणतोय. चार्ली चॅप्लिनच्या सिनेमात एक वाक्य आहेः आय ॲम ॲट पीस विथ गॉड. माय कन्फ्लिक्ट इज विथ मॅन. संजय सर देवाला भक्तीभावे मानायचा. बहुतेक माणसा-माणसांमधले भांडण-तंटे आणि युद्धं दिवसेंदवस वाढत चाललीत त्यांना कंटाळूनच हा इहलोक सोडून तो गेला असेल. देवाच्या सान्निध्यात शांती भोगण्यासाठी. आणि देवलोकसुद्धा खूष झालेला असेल त्याच्या येण्यानं. नक्कीच तिथं हर्षवायूचा स्फोट झालेला असेल. आणि तिथंही त्याला देवादिधेव पाचारत असतीलः संजय सssर…






