गांधी आज प्रासंगिक आहेत का? हा प्रश्न वरचेवर आपल्याला पडत असतो. मुळात, गांधी ही व्यक्ती या देशातील फक्त नेतेमंडळींचीच अडचण नाही. जाहिररित्या सोडाच, पण अंतर्मनाचा कौल घेऊन गांधी थेटपणे नाकारता येत नाहीत. कुठलीही व्यक्ती त्या-त्या काळातील गरजांनुसार वागत असते आणि त्यातही त्या-त्या काळाला पुरून उरेल इतकी सामग्री त्याच्याकडे असेल अशी अपेक्षाही करणे त्या व्यक्तीवर अन्याय करणारे ठरू शकते. त्यामुळे व्यक्तीच्या मर्यादा तो ज्या काळात जन्मला त्या काळासाठी तर असतातच पण त्याचबरोबर काही वर्षे लोटल्यानंतर त्यातल्या मर्यादा अधिक ठळकपणे जाणवतात. त्यातला बराचसा भाग कालबाह्य होणे हे अपरिहार्यच आहे, असे असताना गांधीजी सरळ अडगळीत न जाता पुन्हा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी येतात, याचा अर्थ काहीतरी ‘लोचा’ आहे.
नाकारणाऱ्यांना झटकन नाकारता येत नाही; स्वीकारणाऱ्यांना आपण का स्वीकारतो हे पटकन सांगता येत नाही, अशीच सगळी अवस्था आहे. गांधी प्रासंगिक आहेत का? या प्रश्नावर कदाचित गांधी रागावले नसते. पण त्यांचे अनुयायी मात्र रागावतात. त्यांना हा गांधीजींचा उपमर्द वाटतो. गांधीजींची प्रासंंगिकता तपासण्यात गांधींचा उपमर्द किंवा अपमान होण्याचे कारणच नाही. कारण गांधीजींना प्रासंगिक ठेवणे ही आपली व आजच्या काळाची गरज आहे; गांधीजींची नाही. याचा थोडाफार शोध घेण्याचा प्रयत्न करू.
भारताला स्वातंत्र्य मिळाले; पण हे स्वातंत्र्य फाटकं होतं. प्रचंड रक्तपात होऊन देशाची फाळणी झाली. गांधीजी देशभरातील दंगली शमविण्यासाठी दंगलग्रस्त भागात फिरत होते. सत्य आणि अहिंसा ही प्राणाहून प्रिय असलेली मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत, याचे दुःख उराशी बाळगून देशभरातील द्वेषाच्या वणव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी योद्ध्याच्या आवेशात फिरत होते. त्या वेळेचा एक प्रसंग…
दंगली थांबाव्यात यासाठी मुस्लिम बहुल भागात गांधीजी उपोषण करत होते. उपोषणामुळे त्यांची परिस्थिती खूपच बिकट बनली होती. त्यावेळी एक माणूस गांधीजींसमोर आला. आपल्या हातातील भाकरीचा तुकडा गांधीजींकडे फेकला आणि म्हणाला,
” हा भाकरीचा तुकडा खा, आणि जिवंत रहा, तुमच्या हत्येचे पातक माझ्यावर नको. तुम्ही काहीही केलं तरी मी या दंगलीत हत्या करणारच आहे.”
अशावेळी गांधीजी त्याला शांत करतात आणि विचारतात, काय झालं? त्यावेळी तो मुसमुसून रडतो आणि सांगतो,
“माझ्या दहा वर्षांच्या पोराला मुस्लिम जमातवाद्याने ठार केलं.”
गांधीजी त्याला सल्ला देतात,
“विसरून जा, त्यांना माफ कर. एक पोर तू दत्तक घे, ज्याचे आई-वडील या दंगलीत मारले गेलेले आहेत. फक्त एकच लक्षात ठेव, की तो पोर मुसलमान असला पाहिजे. त्याचे संगोपन मुसलमान म्हणूनच कर आणि त्याला एक चांगला मुसलमान नागरिक बनव.”

आजच्या काळात हा प्रसंग वाचल्यानंतर वेडसरपणाचा वाटेल. कारण दुसऱ्या समूहाबद्दल द्वेष असणं हे जणू नैसर्गिक व स्वाभाविक आहे, असंच मानलं जातं आहे. पण मुळात द्वेषाने द्वेष संपत नाही तो प्रेमाने संपू शकतो हे भूमितीचे प्रमेय समजण्याइतकेही कठीण नाही. पण सत्यात उतरवणे मात्र काहीसं कठीण आहे. माणसाची पारख धर्माच्या नावाने करणे हे फक्त घातकच नाही तर मंदबुद्धीचे काम आहे. सतत इतरांकडे संशयाने आणि अविश्वासाच्या नजरेने पाहणे हे ‘मानसिकरित्या दमवणारे असतं, हे तरी आपण मान्य करूया.
आता प्रश्न राहतो, गांधीजी एवढे मोठे नेते होते तर ते फाळणी का थांबवू शकले नाहीत. त्यांचं हे अपयश नाही का? नक्कीच! गांधीजी फाळणी थांबवू शकले नाही, हे सत्य आहे. पण जीवनाच्या शेवटपर्यंत आपली मूल्य आणि समाज सलोख्याने नांदावा यासाठी गांधीजींनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तीही आजच्या काळात अप्रासंगिक आहे का? आपल्या स्वार्थासाठी दंगल भडकवणारे नेते आणि दंगली शांत करण्यासाठी जीवाची पर्वा न करता दंगलीला निःशस्त्र भिडणारे गांधीजी, कोण प्रासंगिक आहेत? आपली मूल्य जगणारा नेता की समाजाला भावनिक हिंदोळ्यावर झुलवणारे नेते, कोण अधिक प्रासंगिक आहेत?
गांधी आणि देशातील, जगभरातील नेते यामध्ये एक मूलभूत फरक होता. गांधींचं चरित्र लिहिणारे इंग्लिश लेखक लुईस फिशर हे पत्रकार होते. त्या काळातील जगभरातील प्रमुख नेत्यांना ते भेटले होते. या सगळ्यांच्या भेटीवर त्यांनी पुस्तक लिहिले.

ते म्हणतात, सर्व नेते आपली मांडणी अतिशय तर्कशुद्धरित्या आणि ठामपणे मांडत. पण गांधीजी आपली विचार प्रक्रिया कशी आहे, हे सुद्धा अतिशय पारदर्शकपणे समोरच्यापर्यंत ठेवत. नेतेमंडळी आपली विचार प्रक्रिया कधीही कोणाला कळू देत नाहीत. गल्लीबोळातील नेत्याविषयी तर न बोललेलं बरं! वआत एक बाहेर एक असा सगळा मामला असतो. हा गुण आपण नेत्यांकडून घेतला की नेत्याने आपल्याकडून घेतला हे सांगणं मुश्किल. गांधीजी याला अपवाद होते. हा गुण राजकारणामध्ये सोडा आपल्या दैनंदिन आचरणात आणणे गैर आहे का? गांधी इथं अप्रासंगिक आहेत का?
आणखी एक प्रसंग…
गांधीजी अलाहाबाद म्हणजे आजच्या प्रयागराज शहरात होते. पंडित नेहरूंच्या घरी त्यांचं वास्तव्य होतं. जेवण झाल्यानंतर पंडित नेहरू त्यांच्या हातावर पाणी घालत होते. गांधींचे हात धुवून झाले, तरी गप्पांच्या ओघात नेहरूंचं पाणी घालणं सुरू होतं. महात्मा गांधींनी त्यांच्या लक्षात आणून दिलं,
“अरे !तू पाणी वाया घालवतोस.”
पंडित नेहरू हसून म्हणाले,
“गांधीजी, आमच्या अलाहाबादमध्ये दोन नद्या वाहत आहेत. त्यामुळे पाण्याची चिंता करायची गरज नाही.”
गांधीजी पटकन म्हणाले,
“जवाहर, त्या दोन नद्या तुझ्या एकट्यासाठी वाहत नाहीत.”

गांधीजींचा पर्यावरणवाद हा अशा पद्धतीने मानवता वादाशी संलग्न होता. कुठल्याही पद्धतीचा देखावा त्यांना मंजूर नव्हता. जगताना याचे भान आपल्याला आहे का? साधेपणा म्हणजे बावळटपणा असा समज आपण करून घेतला आहे. नेतेमंडळींना भपका केल्याशिवाय त्यांना आपली हवा करता येत नाही. आपल्यालाही साधेपणाचे वावडे आहे, म्हणूनच गांधीजी अप्रासंगिक ठरतात.
गांधीजी या खूप पुढे जाऊन ट्रस्टची कल्पना मांडतात. म्हणजे एखाद्याने आपल्या कष्टाने भरपूर पैसा कमावलेला असेल पण त्याने त्याचा उपभोग घेत असताना आपण या धनाचे मालक नाही ट्रस्टी आहोत, विश्वस्त आहोत, असे त्याचे वर्तन असले पाहिजे, असे म्हटले. हे जरा अतीच झाले! कारण आपण आज अशा समाजामध्ये राहतो की जिथे सरकारी मालकीचे ट्रस्ट, संस्था स्वतःच संस्थान असल्यासारखे त्याचा उपभोग घेत आहोत. अशावेळी स्वतः कमावलेला पैसासुद्धा खर्च करताना विवेक बाळगावा, असलेल्या पैशाचा विनियोग समाजाच्या हितासाठी करावा, हा विचार अव्यवहार्य वाटणं काही चुकीचं नाही.
पण ही चूक त्यावेळी आणि आजही काही खासगी कंपन्या, उद्योगपती करतात. त्यांचा मोठेपणा त्यांनी जमवलेल्या गडगंज संपत्तीवर आपण मोजत नाही तर त्यांच्या आस्थापनांची विश्वासाहर्ता आणि त्यांनी केलेले सामाजिक कार्य यावर बेतलेला आहे. काही उद्योगपती आकाशाशी स्पर्धा करणारे इमले बांधतात. आपल्या पोरा-बाळांच्या लग्नात पैशाच्या जोरावर राजकारण्यापासून क्रिकेटपटू आणि संगीतकारापासून लेखक, पत्रकारांपर्यंत सगळ्यांना तीन-चार दिवस डोंबाऱ्याच्या खेळाप्रमाणे नाचवतात आणि माध्यमे हा सगळा डोंबाऱ्याचा खेळ लोकांना दाखवतात. लोकही त्याचा आनंदाने आस्वाद घेतात. आजूबाजूच्या अडचणींचा विसर पाडून स्वर्गीयगोष्टी अनुभवण्याचं सुख घेतात. इथं गांधीजी अप्रासंगिक ठरतात.
सध्याच्या घडीला सगळ्यात जास्त मागणी असणारी पुस्तक जर कुठली असतील तर ती ‘व्यक्तिमत्व विकास’,’ यश कसे मिळवायचे’, ‘इतरांवर प्रभाव कसा टाकायचा ‘वगैरे गोष्टींची असतात. यात वावगे काहीच नाही. आपण ज्यावेळी एखाद्याचे व्यक्तिमत्व प्रभावशाली आहे असे म्हणतो, त्यावेळी आपल्याला नक्की काय म्हणायचं असतं? एखादा सुंदर दिसतो, तो भरपूर शिकलेला आहे, त्याच्याकडे संवाद कौशल्य आहे… की कुठलीही गोष्ट तो साध्य करू शकतो. मला असं वाटतं. ज्याचं व्यक्तिमत्व खूप चांगले आहे तो माणूस बऱ्यापैकी निर्भय असतो. त्याच्या वागण्यात, बोलण्यात भीतीचा लवलेशही दिसत नाही. मुळात भीती आपलं व्यक्तिमत्व कुरतडून टाकते.

दुर्दैवाची गोष्ट आपण भीतीलाच नीती समजायला लागलो किंवा आपली नीती ही भीतीवरच आधारलेली असते. महात्मा गांधींनी समाजाला निर्भय व्हायला शिकवले. आणि हा प्रभाव शिकल्या-सवरल्यावर किती पडला माहित नाही पण खेड्यापाड्यातील गरीब जनतेवर याचा प्रभाव नक्कीच होता. सनातन दुःखाच्या गहिऱ्या छायेत वावरणाऱ्या इथल्या शेतकऱ्यांना त्यांनी ताठ मानेने जगायला शिकवले. ही निर्भयता कशी काय अप्रासंगिक असू शकते? आजच्या काळात याच निर्भयतेची गरज नाही का?
‘खुदा इस एहसास का नाम है, जो सामने हो और दिखाई न दे’ या शेरमध्ये थोडा बदल करून म्हणावसं वाटतं, ‘गांधी एहसास का नाम है’ बऱ्याच जणांना राष्ट्रपिता महात्मा यासारख्या उपाधीचा तिटकारा आहे. त्यांचं म्हणणं, देश हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. तर एका माणसाला राष्ट्रपिता का म्हणावं? ते म्हणतात,त्यात तथ्य असलेही. त्याचा प्रतिवाद करायची गरज नाही. मुळात शब्दांसाठी भांडण करण्यात काही अर्थ नाही.. राष्ट्रपिता म्हणा, अथवा म्हणू नका, त्यांना महात्मा म्हणा किंवा दुरात्मा म्हणा, त्यांचे पुतळे उभारा किंवा विटंबना करा. गांधी हा एहसास या सगळ्यांना पुरून उरतो. ज्या-ज्या वेळी आपण भोवतालचा कोलाहल बाजूला सारून विवेकाचा आवाज ऐकतो; तिथे गांधीजी असतात. आजही जगभरात अन्याय, अत्याचार घडताना मूकपणे साक्षीदार होणारेही आहेत. त्याचबरोबर मोजके का असेना त्याचा प्रतिवाद करणारे असतात. या सगळ्यांमध्ये गांधींची कमी-अधिक प्रेरणा असते. हा एहसासही नाकारायचा का?
“काय सत्य, अहिंसा याचं कौतुक करता, काय वेगळं सांगितलंय गांधीजींनी. हे तर आपल्या परंपरेने, आपल्या संस्कृतीत फार पूर्वीपासून आहे”,माझा सहकारी एकदा वैतागाने म्हणाला. त्याचा प्रतिवाद मी केला नाही. कारण तो म्हणत होता ते खरं होतं आणि इतकंच नव्हे तर गांधीजींनादेखील हे मान्य होतं. ‘माझे सत्याचे प्रयोग ‘या पुस्तकाच्या मलपृष्ठावर गांधीजींचचे एक वाक्य आहे. मी जगाला काहीही वेगळं सांगत नाही. माझ्या शिकवणुकीमध्ये कुठलीही नवीन गोष्ट नाही. सत्य आणि अहिंसा ही तत्वे डोंगराइतकीच जुनी आहे. प्रश्न आहे तो त्याचे आचरण करण्याचा. माझा अभ्यास नाही पण मला असं वाटतं की, तत्कालीन विचारवंतांनीसुद्धा गांधीजींना त्यांचे मूल्यमापन ही बाब अधोरेखित केलीच असेल.
हजारो वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताने हिच मूल्ये सांगितली. ख्रिस्ताच्या काळातसुद्धा त्याच्यावर हाच आक्षेप घेतला असेल की हे तर गौतम बुद्धाने तुझ्याही आधी सांगितलेले आहे. गौतम बुद्धांनाही लोकांनी काही लोकांनी हिणवलं असेल, की वेद-उपनिषदामध्ये असलेलं तत्त्वज्ञान तू आपल्या भाषेत सांगत आहेस. बुद्धांनी म्हटलं असेल की, अरे बाबा! मी काही वेगळं सांगत नाही. प्रश्न आहे तो आचरण करण्याचा.


महात्मा गांधींनी ही तत्त्वे फक्त सांगितली नाहीत तर आपल्या प्रत्यक्ष आचरणात आणून समाजापुढे ठेवली. राजघाटाजवळ गांधी संग्रहालयात गांधीजींचा ध्वनिमुद्रित आवाज ऐकायला मिळाला. त्यांचं वक्तृत्व अजिबात आकर्षक नव्हते. मग एवढ्या मोठ्या देशावर त्याचा प्रभाव कसा पडला?मला वाटते, गांधीजींचा प्रभाव त्यांच्या वक्तृत्वात नव्हता तर त्यांच्या आचरणात आणि सच्चेपणात होता. ही विचार आणि आचारांची एकतानता गरजेची नाही?
परवाच गोव्यातील सुप्रसिद्ध चित्रकार डॉ. सुबोध केरकर यांचा व्हिडिओ बघितला. ते म्हणाले, गांधींचा असा विचार होता की, तुमचे विचार, तुमचे बोलणे आणि तुमचे आचार यात सुसूत्रता असेल तरच रात्री बिछान्यावर तुम्हाला निवांत झोप लागेल. विचार एक करायचा, बाहेरची परिस्थिती बघून कुणाला तरी खुश करण्यासाठी दुसरे बोलायचं आणि करत असताना या दोघांपेक्षा काही तिसरच करायचं, यातून कदाचित आपण काही साध्य करू शकू पण रात्रीची झोप काही यातून मिळू शकत नाही. मानसिक तणावाला यातून निमंत्रण मिळते. बाकी काहीनाही तर रात्रीच्या निवांत झोपेसाठी तरी गांधीजी आम्हाला हवे आहेत.
गेल्या शतकातील सर्वांत सुदैवी आणि आजच्याही राजकारणांना त्याचा हेवा वाटावा, असा जर राजकारणी कोण असेल तर ते बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. ज्याच्या वागण्या-बोलण्यात कमालीचा अंतर होतं, तरी विद्वेषाच्या काळात ती व्यक्ती सत्तापदी पोहोचली. जन्माने मुस्लिम असलेले ,दारूचे घोट रिचवणारे, डुकराच्या मांसाचे लचके तोडणारे मोहम्मद अली जीनांना कुठल्याही मुस्लिम कट्टरवाद्यांनी गोळी घातली नाही. उलट त्यांचे ते लाडके ‘कायदे आझम ‘झाले.
इतकच कशाला ‘हिंदू‘देशाचा लचका तोडणाऱ्या या नराधमाला पुढे नथुरामनेही गोळी घातली नाही. ती गोळी झाडली गेली स्वतःला सनातन हिंदू म्हणवून घेणाऱ्या आणि तसेच आचरण ठेवणाऱ्या महात्मा गांधी यांच्यावर. बॅरिस्टर अली जिनाचे मुंबईला असलेला आलिशान घरसुद्धा दंगलीच्या जाळपोळीत सापडलं नाही. या उलट महात्मा गांधींची हत्या करणाऱ्याला आपण हुतात्मा ठरवलं. आजच्या घडीला ‘गांधी हत्या ‘या शब्दप्रयोगापेक्षा ‘गांधीवध ‘शब्द जास्त प्रचलित आहे.


अनेकांना गांधीजींविषयी अनेक कारणांसाठी आकर्षण वाटते. ‘माझे स्वतःचे प्रयोग’ ही आत्मकथा वाचत असताना गांधीजी अतिशय सामान्य विद्यार्थी म्हणून आपल्यासमोर येतात. अभ्यासात तल्लख नसलेला, न्यूनगंड असलेला, दिसण्यात किरकोळ तरी सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये , मुलांमध्ये जे अवगुण असतात ते गांधीजींमध्ये ठासून भरले होते. पण आत्मकथेचे एक एक पान वाचत जातो तसतसं गांधीजी नैतिक उन्नयनाची एका एका पायरीने वर चढत जातात. हा प्रवास थक्क करणारा, त्याचबरोबर सर्वसामान्य माणसाला दिलासा आणि आशा देणारा आहे. गांधींचा प्रवास कठीण निश्चितच आहे पण ज्या बिंदूपासून तो प्रवास सुरू झाला होता तो बिंदू सगळ्यांचा एक सारखाच आहे.
आता शेवटचा प्रसंग…
गांधीजींविषयी कुणाला काही माहीत नसले तरी आफ्रिकेमध्ये रेल्वेस्थानकावर घडलेला प्रसंग सगळ्यांना माहिती असतो. रेल्वेतून प्रवास करताना प्रथम वर्गाचे तिकीट काढून गांधीजी डब्यात बसले होते. त्यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी ते काळे भारतीय आहेत म्हणून रेल्वेतून हुसकावून लावून रेल्वे स्थानकावर फेकले. हा प्रसंग शालेय जीवनात आपण अनेकदा ऐकला असेल. पण जरा कल्पना करूया, की त्या रात्री महात्मा गांधींनी काय भोगले असेल? कोणते विचार त्यांच्या मनात आले असतील? राग, अपमान, चीड या सगळ्याच भावनांनी गदगदले असतील. ज्या देशात आपल्याला किंमत नाही तो देश सोडून जाऊया, असाही विचार आलाच असेल.; पण या सगळ्या गोष्टी बाजूला टाकून ते त्याच देशात उभे राहिले आणि अन्यायाचा प्रतिकार केला. अडचण आहे म्हणून वाट बदलणारे आपण आणि ठामपणे उभे राहून परिस्थिती बदलणारे महात्मा गांधी.


दक्षिण आफ्रिकेच्या रेल्वे स्थानकावरच्या या प्रसंगाला शंभर वर्ष झाल्याच्या निमित्ताने त्या स्थानकाजवळ एक सभागृह बांधले . त्याचे उद्घाटन करताना तत्कालीन राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला म्हणाले, “शंभर वर्षांपूर्वी भारताने दक्षिण आफ्रिकेला एक बॅरिस्टर दिला होता. वीस वर्षांनी दक्षिण आफ्रिकेने जगाला एक महात्मा दिला.” बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधी या प्रवासात त्या रेल्वे स्टेशनचे स्थान महत्त्वाचे आहे. किंबहुना, ते रेल्वे स्टेशन टर्निंग पॉईंट ठरले असे म्हणता येईल. आपल्याही आयुष्यात अशी अनेक स्टेशन्स येतात पण काही ना काही कारणांनी योग्य स्टेशनवर उतरणे राहून जाते. अशावेळी जीवनातील स्टेशन गाठण्यासाठी महात्मा गांधी कदाचित उपयोगी पडू शकतात. आजच्या काळात गांधींजींची हीच प्रासंगिकता असेल.
(हा लेख पुढारी गोवा आवृत्तीच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला आहे.)




