मागच्याच आठवड्यात कुडचडेतील बाणसाय येथे मध्यरात्री अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या झारखंडच्या युसूफ आलम या तरुण मजुराचा अज्ञातांनी बंदुकीतून गोळ्या झाडल्यामुळे जागीच मृत्यू झाला. युसूफ आलम खान हा झारखंडहून पोटापाण्यासाठी आपल्या परिवारापासून दूर गोव्यात मजुरी करून पोट भरायचा. अवैध रेती उपसा व्यवसायातील तो एक साधा मजूर होता, म्होरका नव्हे. तो जे काम करत होता ते बेकायदेशीरच होते पण त्याची कदाचित त्याला जाणीव नसावी. असली तरी पोटाची खळी भरण्यासाठी कधी कधी अश्या मजुरांना गरीब परिस्थितीमुळे बेकायदेशीर कृत्ये केल्या शिवाय जगण्यासाठी दुसरा पर्याय नसतो. युसूफ आलमच्या दुर्दैवी मृत्यूमुळे ना कुणी हळहळला ना त्याची राष्ट्रीय स्तरावर सोडाच साधी स्थानिक पातळीवरही कुणी दखल घेतली. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून या प्रकरणाची सिबिआय चौकशी करण्याची वगैरे मागणी केल्याचे काही ऐकिवात नाही. नाही तरी, झारखंडचे मुख्यमंत्री तशी मागणी का म्हणून करतील. युसूफ हा काही मोठ्या राजकीय पक्षाचा नेता नव्हता. तो काही सेलेब्रिटी नव्हता.
हरियाणातील भारतीय जनता पक्षाची पुढारी असलेली सोनाली फोगाट हिचा काही दिवसां आधी गोव्यात मृत्यू झाला. राष्ट्रीय स्थरावर अजूनही तिच्या मृत्यूची बातमी गाजत आहे. सोनाली फोगट ही शिक्षीत होती, सामाजिक- राजकीय क्षेत्रांत सक्रिय असल्यामुळे कायद्यांचा तिला अभ्यास असावा. वैयक्तिक आणि सामाजिक जिवनातील आपली कृत्ये कायद्याच्या आणि नैतिकतेच्या चौकटीत बसतात का नाही याची तिला जाणीव असावी. त्यामुळे ज्या पार्श्वभूमीवर तिचा मृत्यू झालाय त्याला ती स्वताही तितकीच जबाबदार आहे असे खेदाने म्हणावे लागेल.
सोनालीच्या मृत्यू नंतर गोवा पुन्हा एकदा ड्रग्स, दारू आणि रेव पार्ट्या यामुळे बदनाम होतोय. दुर्दैवाने आम्हा गोमन्तकीयांना गोव्याच्या बदनाम ओळखीचा अभिमान वाटतो. काही वर्षां पासून अधूनमधून व्हॉट्सएपवर एक संदेश फिरतो. त्यात भारतातील विविध राज्ये कशासाठी प्रसिद्ध आहेत त्याचा उल्लेख आहे. या संदेशात गोवा कशासाठी प्रसिदध म्हणून सांगितलय माहित आहे का? चक्क दारूसाठी! मला हा मेसेज पाठवणारे महाशय गोव्यातील एका नामांकीत विद्यालयातून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेले. मी ह्या मेसेज मध्ये दारूच्या जागी ‘आदरातिथ्य’ हा शब्द घालून त्यानाच परत पाठवला आणि सुधारित मेसेज इतरांना फॉरवर्ड करण्यास सांगितले. सुसंस्कृत आणि सुशिक्षीत गोव्याची प्रतिमा जगात मलीन होत आहे याचे दुर्दैवाने कुणालाही सोयर सुतक नाही. काही वर्षां आधी हणजूण किनाऱ्यावर घडलेल्या स्कार्लेट खून प्रकरणामुळे तर गोव्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी झाली होती. बॉलिवूडने तर गोवा म्हणजे दारूड्यांचा प्रदेश असाच समज जगाला करून दिलेला आहे. यामुळे गोव्यातील सरसकट मुले आणि बायकाही राजरोसपणे दारू पितात असाच जगाचा समज झालेला आहे.
गोव्यात ड्रग्स सहजपणे कुठेही आणि कधीही मिळू शकतात ही आजची वस्तुस्थिती आहे. सुमारे पन्नास वर्षां आधी गोव्यात हिप्पी पर्यटन सुरू झाले आणि त्याच सुमारास काही प्रमाणात ड्रग्सचा व्यवहारही सुरू झाला. स्थानिकांना त्यातून सहजपणे पैसे मिळू लागले. सुरवातीला फक्त किनारी भागां पुरता सिमीत राहिलेला हा व्यवसाय पुढे गोव्यातील शहरांत आणि तेथून छोट्या मोठ्या गावां पर्यंत विस्तारत गेला. आज गोव्यातील कुठल्याही ग्रामिण भागात सहजपणे ड्रग्स मिळू शकतात. गोव्यातील प्रमुख शहरांतील भेळपुरीच्या गाड्यांवर, पानपट्टीवाल्यांकडे तसेच काही ठिकाणी तर झोपडीवजा दुकानांतही हे ड्रग्स विनासायास मिळतात असे सर्वसामान्य लोकांचे निरिक्षण आहे, आणि त्यात बरेच तथ्यही आहे. ड्रग्स व्यवसायातील या छोट्या-मोठ्या दलालांमध्ये गोमंतकीयां बरोबरच भारतातील इतर प्रदेशांतून आलेल्या तसेच नायजेरियन नागरिकांचाही मोठा भरणा आहे. हा व्यवसाय आज संपुर्ण गोव्यात इतका फोफावलाय की विनोद पालयेकर सारख्या तत्कालीन मंत्र्यानाही त्या विरुद्ध उठविलेला आवाज मागे घ्यावा लागला होता.
2022च्या जानेवारी पासून ऑगस्ट पर्यंत आठ महिन्यांत गोव्यात ड्रग्स संबंधीत फक्त 62 प्रकरणे नोंद झालेली असून हा आकडा इतर राज्यां पेक्षा बराच कमी आहे. या प्रकरणांत फक्त छोट्या माश्यांनाच अडकवण्यात आलेले असते. असे हे दलाल न्यायालयात जामिनावर सुटतात आणि पुन्हा तोच व्यवहार करण्यास मोकळे होतात. पुलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्सचे पुढे काय केले जाते तेही जनतेला कळण्यास मार्ग नसतो.
आता गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्याच्या काळात ड्रग्स व्यवहाराचा बीमोड करण्याचे जाहीर केलेले आहे. डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्रीपदाच्या या कार्यकाळात ज्या तरेने निर्णय घेउन ते राबवत आहेत ते बघितल्यास पुढील काळात गोव्यातील ड्रग्स व्यवहार बंद होण्याच्या अपेक्षा बाळगण्यात हरकत नसावी. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रामाणीकपणे बाळगावी लागेल इतके निश्चीत. या व्यवसायातील प्रमुख घटक असलेल्या नायजेरियन तसेच इतर विदेशी नागरिकांचे गोव्यातील बेकायदेशीर वास्तव्य शोधून काढावे लागेल. पोलिसांना आपले कर्तव्य प्रामाणीकपणे पार पाडावे लागेल. हैदराबादच्या पोलीसांनी केलेला आरोप खोटा आहे हे सिद्ध करावे लागेल.
आज ड्रग्सचा पुरवठा महाविद्यालयांतून माध्यमिक विद्यालयां पर्यंत पोहोचलेला आहे. तो घरा-घरांत पोहोचायला वेळ लागणार नाही. ट्युशनचे क्लास जिथे चालतात अश्या बऱ्याच ठिकाणीही ड्रग्सचे अड्डे सापडतील. गोवा मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये तेथील इंटर्नकडे नुकताच गांजा सापडण्याचा प्रकार उघडकीस आला होता. पुडुचेरीच्या एका विद्यार्थ्याचा हल्लीच गोव्यात ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता. काणकोण, सत्तरी, पेडणे सारख्या ग्रामिण भागातही मोठ्या प्रमाणावर स्थानिक युवक ड्रग्सच्या विळख्यात सापडलेले दिसून येतील.
ड्रग्सची पाळेमुळे खणून काढायची असतील तर सनबर्न सारखे इवेंट्स आधी बंद करावे लागतील. या इवेंटमध्ये ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मृत्यू झालेली अनेक उदाहरणे आहेत. अश्या इवेंटस्कडे ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणून नव्हे ‘शो मस्ट नाव स्टॉप’ म्हणून शासनाने पाहावे लागेल. वर्षातून कधीतरी एकदा छापे टाकून छोट्या माश्यां कडून वीस- तीस ग्राम डग्स पकडून मर्दुमकी गाजविणे थांबवावे लागेल. या व्यवसायातील बड्या धेंडाना पकडण्याचे आव्हान शासनाने पेलावे लागेल.
कित्येक गोमन्तकीय तरूणानी ड्रग्सच्या विळख्यात सापडून आपले जिवन बरबाद करून घेतलेले आहे. मुलांच्या डग्स व्यसनामुळे कित्येक परिवार रसातळाला पोहोचलेले आहेत. कित्येक गोमन्तकीय युवकांना ड्रग्सच्या व्यसनामुळे जीव गमावावा लागलेला आहे. ड्रग्सच्या नशेत युवकांकडून खुनासारखे गंभीर गुन्हे घडलेले आहेत. परंतू दुर्दैवाने कुठल्याच शासनाने हा विषय गंभीरपणे घ्यायचे धाडस आणि प्रामाणिकपणा आजपर्यंत कधीच दाखवला नव्हता. आत्ता सोनाली फोगटच्या निमित्ताने का असेना डग्सच्या विळख्यातून गोव्याची सुटका होत असेल तर त्याचे आपण स्वागत केलेच पाहिजे.