तीसेक वर्षा आधीची गोष्ट. एका मित्राच्या घरी पहिल्यांदाच गेलो होतो. त्या काळी आजच्या सारखा मोबाइल किंवा गुगल मॅप वगैरे नव्हता. बस कंडक्टरला ‘गोविंदाल्या पसऱ्याकडेन देंवय म्हूण सांग’ असे मित्राने सांगितले होते. तेथे उतरल्यावर दुकानदारास माझे नाव सांग तो तुला माझ्या घरची वाट दाखवेल असाही सल्ला मित्राने दिला होता. मी गोविंदा पसऱ्याकडेन स्टॉपची तिकीट घेतली आणि कंडक्टरला विनंती केल्याप्रमाणे त्याने मला नेमक्या स्टॉपवर उतरवले.
मित्राच्या घरची वाट विचारण्यासाठी मी तेथेच असलेल्या दुकानावर गेलो. आत असलेल्या एका तरूणाला आदराने ‘गोविंदबाब, अमूक अमूक माणसाच्या घरचा पत्ता जरा सांगता का?’ असा प्रश्न केला. माझा प्रश्न ऐकून त्याच्या चेहऱ्यावर मला थोडासा रागच जाणवला. म्हटल असतात काही लोकांचे चेहरे असेच रागिश्ट. मित्राच्या घरून संध्याकाळी परत येताना मित्र माझ्या सोबत बस स्टॉपवर आला होता. मी सहज मित्राला दुकानदाराचा मला आलेला अनुभव सांगितला. म्हटल, ‘गोविंदबाब म्हूणन आदराने संबोधून सुद्धा त्याने मला रागाने उत्तर दिले’. त्यावर माझ्या मित्राने दुकानातील भिंतीवर लटकविलेल्या एका फोटोला बोट दाखवत ‘तो पळय, गोविंद थंय आसा’ म्हणून सांगितले. दुकानदार माझ्याकडे रागाने का बोलला याचे कारण मला समजले! गोवींद हे दुकानाचे मूळ मालक. त्यांचा मृत्यू होवून आठ-दहा वर्षे झाली होती. बस स्टॉपचे नाव मात्र बदलले नव्हते.
सद्या गोव्यात मोपा विमानतळाला कुणाचे नाव द्यावे यावरून वाद चालू आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर आणि गोव्याच्या विकासात महत्वाचे योगदान दिलेले मनोहरभाई पर्रीकर यांची नावे विमानतळाला देण्यात यावीत असे मानणारे दोन गट सद्या तयार झालेले आहेत.
‘गोव्यातील काही महाविद्यालयांना जिवंत व्यक्तींची नावे दिलेली आहेत. आपले नाव अमर राहण्याची व्यवस्था काही राजकारणी लोकांनी जिवंतपणीच करून ठेवलेली आहे’ असे दहा वर्षां पुर्वी कोंकणी भाशा मंडळाच्या रवीन्द्र केळेकर ज्ञानमंदीर या माध्यमिक विद्यालयाचे नामकरण केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यानी म्हटले होते. ‘अश्या लोकांची मला कीव येते. चांगले काम करा, वास्तुंना किंवा संस्थांना नाव न ठेवताही आपण इतिहासात अजरामर व्हाल’ असेही त्यानी त्यावेळी म्हटल्याचे आठवते. देशातील उच्च पदावरील कित्येक नेत्यांनाही आपल्या जिवंतपणीच आपली नावे वास्तुनां देण्याचा मोह आवरता आलेला नाही.
भाऊसाहेब बांदोडकर तसेच मनोहर पर्रीकर हे दोघेही पुढारी मृत्यू नंतरही गोमंतकीयांच्या हृदयात स्थान मिळवून राहिलेले आहेत. मुक्त गोव्याच्या इतिहासात सर्वसामान्य लोकांच्या हृदयांवर अधिराज्य गाजवणारे भाऊ आणि भाई हे वादातीत नेते होते ह्याविषयी दुमत असूच शकत नाही. दोघांच्याही कार्यकाळांचा विचार केला तर निश्चितच त्या वेळची आव्हानेही कमी जास्त प्रमाणात तितकीच खडतर होती.
‘मृत्यू नंतर ज्यांची कोणीही आठवण काढणार नाहीत त्यांची स्मारके बांधणे समजण्या सारखे आहे. पण जे जिवंतपणीच अजरामरपणाच्या मार्गाने चालत पुढे गेले त्यांच्या स्मारकांची कसली गरज? प्रेरणेच्या स्वरुपातच ते सदाकाळ जिवंत राहतील’ असे जेश्ट स्वातंत्र्यसैनिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रवीन्द्रबाब केळेकर म्हणायचे. भाऊ बांदोडकर असोत वा भाई पर्रीकर दाघांनीही जिवंतपणीच जनमानसात इतक्या खोलवर स्थान मिळविलेले आहे की त्याना अजरामर होण्यासाठी कुठल्याही स्मारकांची गरज नाही आहे.
भारतातील रेल्वे स्थानकांना एखादा दुसरा अपवाद वगळल्यास व्यक्तींची नांवे दिलेली उदाहरणे नाही आहेत. मुंबईत काही वर्षां आधी व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले. आज हे स्टेशन बहुतांश ‘सिएसटी’ नावाने ओळखले जाते याची खंत वाटते.
पणजीला अटल सेतू दिमाखाने उभा आहे. पर्यटकां बरोबरच गोमन्तकीयांचेही ते एक खास आकर्षण आहे. अटल सेतूच्या बांधकामात झालेला कथित भ्रश्टाचार, त्यावर सतत होणारे अपघात, पुलावरील खड्डे यामुळे पूल तर बदनाम झालेला आहेच पण त्याबरोबरच अटलबिहारी वाजपेयी सारख्या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचाही अवमान होत आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. काणकोण मधील मनोहर पर्रीकर बगल रस्त्याच्या दर्ज्यावरूनही जेव्हा जेव्हा बोलले जाते तेव्हा फक्त हा महामार्गच नव्हे तर ज्यांचे नाव त्या रस्त्याला दिलेले आहे ते नावही बदनाम होत असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. एखाद्या प्रकल्पाला राजकीय पुढाऱ्याचेच नाव द्यायला हवे असाही काही नियम नाही. फक्त राजकारणात नव्हे तर गोव्याच्या विकासात विविध क्षेत्रांत विशेष योगदान दिलेल्या व्यक्तींची नांवे सरकारी प्रकल्पांना देणे हे शासनाचे कर्तव्य आहे.
गोवा मुक्ती संग्रामातील हुतात्मा कर्नाल सिंग यांचे नाव मोपा विमानतळ ते पत्रादेवी या नवीन हमरस्त्याला देण्याचे मुख्यमंत्र्यानी नुकतेच जाहीर केलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे सर्वांनीच स्वागत केलेले आहे. हाच धागा पुढे नेत मोपा मिमानतळाला गोवा मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मा बाळा राया मापारी यांचे नाव दिल्यास स्वातंत्र्यसंग्रामातील प्रत्येक विराचा यथोचित सन्मान केल्याचे समाधान शासनाला लाभेल. गोवा मुक्ती संग्रामाच्या शेवटच्या पर्वाचा आरंभ ज्यांच्या प्रेरणेतून झाला त्या डॉ. राम मनोहर लोहियांचे ही नाव मोपा विमानतळासाठी योग्य आहे. अश्या अनेक नावांचा शासनाने विचार करायला हवा.
जगात असे कित्येक पुढारी होवून गेलेत ज्यांच्या नावावर कुठलाही प्रकल्प नाही आहे. तरी ते अजरामर होवून पिढ्यान पिढ्या लोकांच्या हृदयात स्थानापन्न आहेत. ‘यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर, घडविले मानवतेचे मंदिर, परी जयांच्या दहनभूमिवर, नाहि चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती…’ या जेश्ठ कवी बाकीबाब बोरकार यांच्या कवितेतील शब्दांनी त्याची प्रचिती येईल.
एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे. शेवटी विमानतळाला शासनाला जे नाव हवे असेल तेच दिले जाईल. शेवटी हा अधिकार केंद्र शासनाचा. म्हणजेच गोवा शासनाला जे नाव पाहिजे तेच केंद्र शासनाच्या नावाखाली दिले जाईल. विशिष्ट नावासाठी गोंधळ घालणारे चार दिवस आक्रमक बनतील आणि शेवटी थंड बसतील हा इतिहास आहे. त्यामुळे आपल्या प्रामाणीक भावना व्यक्त करताना कुणा दुसऱ्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घेऊ या. भाऊ असो वा भाई दोघांचाही मान राखू या!