नरसिंहमामांनी सुरू केलेले गोव्याचे स्वातंत्र्यपर्व

गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात आहुती दिलेले केवळ 15-20 स्वातंत्र्यसैनिक आज हयात असतील. त्यातील बहुतेकजण तर घराबाहेर पाऊल टाकण्याच्या सुद्धा परिस्थितीमध्ये नाहीत. या पार्श्वभूमीवर एकेक स्वातंत्र्यसैनिक काळाच्या पडद्याआड जातो आहे आणि त्यांच्यासोबत इतिहासाचे एकेक पानसुद्धा. याच आठवड्यात माझ्या काणकोणातील माशे, लोलयेच्या गावचे नरसिंह प्रभू यांचे वयाच्या 87 व्या वर्षी मुंबईत त्यांच्या रहात्या घरी दुःखद निधन झाले आणि इतिहासाचे चालते-बोलते आणखीन एक पान गडप झाले. 

आम्ही त्यांना नरसिंहमामा म्हणायचो. गणेश चतुर्थीला गावात आले की न चुकता आमच्या घरी यायचे. माझे आई-बाबा ही त्यांची दैवतेच जणू. खास करून माझ्या वडिलांनी केलेल्या कार्याबद्दल हल्ली हल्लीपर्यंत फोन करून बोलायचे. स्वातंत्र्यलढ्याच्या लिखित इतिहासामध्ये त्यांच्यावर कसा अन्याय झालेला आहे ते सांगायचे. मी ते लिहीत नाही म्हणून माझ्यावर अधिकारवाणीने उखडायचे. ते पाठीमागे लागल्यानेच मग मी हयात असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना भेटायला लागलो. गांधीवादी सत्याग्रहींपासून बंदूकधारी आझाद गोमंतक दलापर्यंतल्या कित्येकांना. आणि एक वेगळाच इतिहास डोळ्यांपुढे आला. 

तो कधीतरी लिहीनच. परंतु आज नरसिंहमामांविषयी. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी पणजी शहरात जो सत्याग्रह केला होता त्याविषयी. कारण तेही इतिहासात ठळकपणे कुठेच नमूद झालेले नाही. 

आंतरराष्ट्रीय दबाव व नेहरू

गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याला मदत करण्यासाठी भारतातील स्वातंत्र्यसैनानींनी जून 1954 मध्ये पुणे शहरात ‘गोवा विमोचन समिती’ची स्थापना केली होती. 15 ऑगस्टच्या शुभमुहुर्तावर गोव्याच्या सीमा पार करून 500 भारतीय सत्याग्रही गोव्यात प्रवेश करतील असे जाहीर केले होते. त्यामुळे पोर्तुगीज सरकारचे धाबे दणाणले होते.

‘नाटो’सारख्या पश्चिमी राष्ट्रांच्या लष्करी संस्थेपासून अमेरिका व ब्रिटनपर्यंत सर्वांशी संपर्क साधून हे सत्याग्रह होऊ नयेत म्हणून भारत सरकारवर दबाव आणण्याचे महत्प्रयास चालू होते. भारत सरकार पोर्तुगालात येऊन गोमंतकीयांना चिथावत आहेत असे आरोप आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाले होते. दुसऱ्या बाजूने पाचशेंचा सत्याग्रहींचा आकडा पाच हजारावर पोचला होता. 

संयुक्त राष्ट्र संघ परिषदेत भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू

 

त्यामुळे 13 ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी जाहीर केलेः “गेली सात वर्षे आम्ही लोकांना थोपवून धरले. बिगर-गोमंतकीयांनी गोव्यात जावू नये ही माझीही भुमिका आहे. परंतु गोमंतकियांना गोव्यात प्रवेश करण्यापासून मी थांबवणार नाही.”

गोमंतकियांचा सीमा-सत्याग्रह

आंतरराष्ट्रीय पातळीवरील दबावामुळे या भुमिकेशी चिकटून राहून भारत सरकारने 15 ऑगस्ट रोजी सुमारे 1200 भारतीय सत्याग्रहींना गोव्यात प्रवेश करण्यापासून अटकाव केला. परंतु पोळे, पत्रादेवी व तेरेखोल सीमांवरून गोमंतकीय सत्याग्रही गोव्यात शिरले. आमच्या पैंगीणच्या आल्फ्रेड आफोंसोच्या नेतृत्वाखाली एका दिवसासाठी को होईना, तेरेखोल किल्ला काबीजसुद्धा केला. सर्वांना अटक झाली.

परंतु त्यामुळे स्वातंत्र्य संग्रामात नवीन उत्साह संचारला व गोवाभर सत्याग्रहांचें पेवच फुटले. त्या सर्वांना अटक करून एक वर्ष ते 28 वर्षेपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षा फर्मावण्यात आल्या. कित्येकांची रवानगी पोर्तुगाल आणि आफ्रिकेतील पोर्तुगीज वसाहतीतल्या काळकोठड्यांत करण्यात आली. 

पोळे सरहद्दीवरून गोव्यात शिरलेलेले गोमंतकीय सत्याग्रही

 

4 मे 1955 रोजी राज्यसभेत बोलताना प्रधानमंत्री पंडित नेहरूंनी शिक्षा झालेल्यांची संपूर्ण आकडेवारीच वाचून दाखवली ती अशीः

15 ऑगस्ट व नंतर सप्टेंबरमध्ये अटक झालेले सत्याग्रही एकूणः 135

लष्करी लवादाने सुनावलेल्या शिक्षाः

28 वर्षेः 1 स्वातंत्र्यसैनिक

8 वर्षेः 3 स्वातंत्र्यसैनिक

7 वर्षेः 10 स्वातंत्र्यसैनिक

6 वर्षेः 8 स्वातंत्र्यसैनिक

5 वर्षेः 6 स्वातंत्र्यसैनिक

4 वर्षेः 11 स्वातंत्र्यसैनिक

3 वर्षेः 4 स्वातंत्र्यसैनिक

1 वर्षः 1 स्वातंत्र्यसैनिक

नानासाहेब गोरे-सेनापती बापटांनी फुंकले गोव्याचे रणशिंग

या दडपशाहीचा निषेध करीत ‘गोवा विमोचन समिती’ने आपला पावित्रा बदलला आणि पंडित नेहरूंनी आता ठोस कारवाईसाठी पावले उचलावीत असे जाहीर आवाहन 24 एप्रिल 1955 रोजी भारत सरकारला केले. महाराष्ट्रातील उत्तुंग व्यकिमत्व असलेले समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांनी आपण गोव्यात प्रवेश करून सत्याग्रह करणार असे जाहीर केले. 

4 मे रोजी पंडित नेहरूंनी राज्यसभेत बोलताना सांगितलेः “गोव्याच्या बाबतीत भारताची भुमिका स्थिर स्वरुपाची नव्हे, तर परिवर्तनकारीच राहील.” म्हणजे भारत सरकार आता भारतीय सत्याग्रहींना गोव्यात प्रवेश करण्याची परवानगी देईल असा अन्वयार्थ पोर्तुगालने काढला. त्याचा गर्भितार्थ होताही तसाच.

सरहद्दीवरील पोर्तुगीज पोलिसांचा दहशतवाद

 

ना. ग. गोरे, सेनापती बापट व इतरांनी 18 मे 1955 रोजी आपण गोव्यात प्रवेश करून सत्याग्रह करू असे जाहीर केले. सेनापती म्हणजे कोणी तरी सैन्यप्रमुख बंदूकधारी सहाय्यकांना घेऊन गोव्यावर चाल करून येणार अशी पोर्तुगीजांची धारणा झाली.

(डॉ राममनोहर लोहियांनी 18 जून 1946 रोजी गोव्याचा स्वातंत्र्यलढा सुरु केल्यापासून सर्व महत्वाचे सत्याग्रह बहुतेक 18 तारखेलाच व्हायचे.)

गोव्यातील दचकलेली मरगळ

हे फार मोठे मुत्सद्दी पाऊल होते. आंतरराष्ट्रीय दबावाची पर्वा न करता भारत सरकारने लढाऊ भुमिका घेण्यास सुरवात केली होती. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचे एक नवीन क्रांतिकारी पर्व सुरु होणार होते. त्यामुळे ‘नॅशनल काँग्रेस गोवा’चे संयोजक पुढारी पीटर आल्वारीस यांनी ठरविले की हा दिवस आपण ‘युवक दिन’ म्हणून गोवाभर साजरा करायचा. गोव्याच्या तरुणांनी पणजीच्या राजधानीत सत्याग्रह करून. गोव्याच्या प्रत्येक तालुक्यातून किमान एक युवक. किमान 11 युवकांचा राजधानीत सत्याग्रह! 

समाजवादी नेते एस एम जोशी (डाव्या बाजूला) व बॅ नाथ पै (उजव्या बाजूला) यांच्यामध्ये पीटर आल्वारीस

 

परंतु पोर्तुगीजांच्या दडपशाही दबावतंत्रामुळे वातावरण बदलले होते. हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. तेव्हा यावर खल करण्यासाठी त्यांच्या बेळगावच्या कार्यालयात बैठक झाली. पीटर आल्वारीससोबत माझे वडील मनोहर प्रभुदेसाईही होते.

त्यांनी सांगितलेः “पीटर, केवळ अकरा कशाला, आमच्या काणकोणमधूनच आम्ही तुला 15 तरुण देतो.”

सिंधूताई देशपांडे नेवरा-मंडूर या भागातील आदिवासींमध्ये काम करीत होत्या. त्यांना अटक झाली होती, परंतु तिथलेही काही तरुण मिळण्याची शक्यता होती. काणकोणातील, खास करून लोलये व पैंगीण गावातील युवक सीमापार कर्नाटकाच्या (भारतातील) सदाशिवगड व कारवारच्या शाळांमधून शिकत होते आणि आंगडी,माजाळी येथील ‘नॅशनल काँग्रेस गोवा’च्या कार्यालयाद्वारे स्वातंत्र्यलढ्याचे कार्य करीत होते. पोर्तुगीज सरकारने इतिहासाच्या मराठी पाठ्यपुस्तकांवर बंदी घातल्यावर भूमिगतरित्या ती पाठ्यपुस्तकेही गोव्यातील मराठी शाळांना ते पुरवीत होते. त्यातूनच तरुणांची फौज पणजीच्या सत्याग्रहासाठी तयार झाली. मनोहर प्रभुदेसाईंना या सत्याग्रहाच्या केवळ आठ दिवस आधी अटक केल्यानंतर आंगडीचे कार्यालय सांभाळणारे नरसिंह प्रभू त्यांचे म्होरके होते. 

पणजीतील एकमेव संघटित सत्याग्रह

हा सत्याग्रह हे फारच धाडसी पाऊल होते. कारण 1946 पासून गोव्यात अनेक ठिकाणी सत्याग्रह झाले होते. परंतु राजधानीच्या पणजी शहरात संघटित शक्तीचा सत्याग्रह कधीच झालेला नव्हता. केवळ दोन झालेले होते. परंतु ते व्यक्तिगत स्वरुपाचे होते.

पहिला होता तो सिंधूताई देशपांडेंचा. अवध्या 30 वर्षे वयाच्या या विद्युल्लतेने 25 नोव्हेंबर 1954 रोजी लक्ष्मण गोवेकर यांना सोबत घेऊन पोलीस खात्याच्या मुख्य कचेरीसमोर, गव्हर्नर जनरल, सेनाधिकारी व शेकडो सैनिक व पोलिसांसमोर हातात तिरंगा घेऊन ‘जय हिंद’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे जानेवारीपर्यंत त्या तुरुंगात होत्या.

सिंधूताई देशपांडे

 

दुसरा झाला होता तो 26 जानेवारी 1955 रोजी गोवाभर झालेल्या सत्याग्रहांचा भाग म्हणून. त्यावेळी श्रीयुत दिनानाथ आमोणकर व श्रीमती सेलीन मोनीज हे दोघे पैलतीरावरून तिरंगा हातात घेऊन होडीतून आले होते. पणजीच्या धक्क्याला होडी लागल्याबरोबर त्यांना अटक झाली होती. मात्र याची योजना मिरामारच्या किनाऱ्यावर शिजली होती.

11 युवकांचा पराक्रम

परंतु 18 मे 1955 च्या या सत्याग्रहात मात्र एकूण 15 युवक सहभागी होणार होते. शेवटच्या क्षणी काणकोणातून चौघे आले नाहीत. अकरा जणांनी सत्याग्रह केला. नरसिंह प्रभू व रामदास खटलो प्रभू (माशे, लोलये), माधव प्रभुदेसाई बोरुसकर (बोरूस, लोलये), देविदास उर्फ विष्णू पै (पणसुले, काणकोण), विठ्ठल पवार व वामन प्रभू (पैंगीण), जिवा गांवकर (गांवडोंगरी) आणि दुलो कुट्टीकर, गोविंद गांवकर, गणेश नागवेकर व कृष्णा नाईक (डोंगरी, मंडूर).  

त्यातले काणकोणातील सत्याग्रही आदल्या रात्रीच पणजी शहरात येऊन राहिले होते. काजळकेर, लोलयेचे कृष्ण वारीक यांची त्यावेळी पणजीत पालाशीकडून चर्चकडे जाणाऱ्या गल्लीत ‘उषा भवन’ ही खानावळ होती. ते राहिले होते तिथे बाजूलाच पोर्तुगीज सीआयडींच्या खोल्या होत्या. वारीक हे सत्याग्रहींचे समर्थक होते. त्यामुळे त्यांनी सत्याग्रहींना आधीच सावध केले व त्यांना गुप्त बैठक घेण्यासाठी एक वेगळी खोलीही दिली.

आता नवीन पाटो पूल झालेला आहे तिथे बाजूला असलेल्या पेट्रोल पंपजवळ जुने बस स्थानक (प्रास) होते. तिथून सत्याग्रगही मिरवणूक सुरू करून पोर्तुगिजांचे सत्तास्थान असलेल्या पालाशीपर्यंत घोषणा देत जाण्याची योजना होती. त्यामुळे त्या रस्त्यावर असलेल्या बाकड्यांखाली रात्रीच्या वेळी जाऊन त्यांनी ध्वजांच्या काठ्या लपवून ठेवल्या. काणकोणची कार्रेर 12 वाजता पणजीत पोचत असे. त्यातून इतर तरुण विद्यार्थी सत्याग्रहासाठी येणार होते. परंतु ते आलेच नाहीत. त्यामुळे निर्णय घेण्यास थोडा उशीर झाला. 

दीड वाजण्याच्या सुमारास अचानक प्रासावर युवकांच्या दोन रांगा खड्या झाल्या. काणकोण व मंडूरच्या. बाकांखाली लपवलेल्या काठ्यांवर तिरंगे स्वार झाले आणि घोषणा दुमदुमलीः ‘जय हिंद’. एका सुरात स्वातंत्र्यसैनिक कवी गजानन रायकरांचे स्वातंत्र्यगीत गात मिरवणूक सुरू झालीः “व्हा पुढे चला पुढे चला पुढे, रोवू चला पणजीवर विजयी झेंडे”.

प्रासावरील प्रवासी, आजूबाजूच्या सरकारी कार्यालयातून बाहेर आलेले कर्मचारी व इतर लोकांची रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी जमली होती. सर्वात जास्त होते ते आपल्या मुलांच्या पराक्रमाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी मुद्दामहून गावातून चालत आलेले नेवरा-मंडूरचे कष्टकरी आदिवासी. 

गोरे, सेनापती व गोव्याचे निर्भय शिलेदार

या प्रकाराची यःकिश्चितही कल्पना नसलेले पोलीस धावत येईपर्यंत ही मिरवणूक अगदी पालाशीपर्यंत पोचली होती. अर्थात, त्यांना लगेच अटक झाली, कावलमारीने अनानुष मारहाण झाली. दुसऱ्या बाजूने नानासाहेब गोरे आणि सेनापती बापटांसोबत असलेल्या 52 सत्याग्रहींना डिचोलीत लाकेरीला पोहोचेपर्यंत अटक झाली. आरोंदेची खाडी पार करून सकाळी पेडणे बाजारात प्रगट झालेल्या त्यांच्यातल्या नऊ सत्याग्रहींना पेडणेत अटक झाली. हवेत गोळीबार होऊन चारजण जखमीही झाले.

या 68 सत्याग्रहींमध्ये महाराष्ट्रातील 53, उत्तर प्रदेशातील 3, बिहारमधील 2, राजस्थान, बंगाल, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व कर्नाटकातील प्रत्येकी 1 व इतर गोमंतकीय होते. गोरे व सेनापतींना पणजीत आणून रक्त्याच्या गुळण्या येईपर्यंत मारहाण झाली. इतरांना बांदा व कॅसलरॉक सरहद्दीवर नेऊन सोडण्यात आले. 

पणजीतील युवक सत्याग्रहींना अमानुष मारहाण झाली. ते बिगरगोमंतकीय आहेत अशी समजूत करून घेऊन त्यांनाही सोडण्यात आले असे आजपर्यंतचा लिखित इतिहास सांगतो. परंतु प्रत्यक्षात ते खरे नाही.

एक गोष्ट म्हणजे यातील बहुतेक सत्याग्रही हे 18-19 वर्षांपर्यंतचे होते. कुमारवयीन मुलांना तुरुंगात ठेवणे पोर्तुगीज कायद्यात बसत नव्हते. शिवाय गोमंतकीय सत्याग्रहींना शिक्षा झाली तर गोव्यात स्वातंत्र्यलढा अजून चालू आहे ही बातमी जगभर पसरली असती. म्हणून त्यांनाही ते गोमंतकीय सत्याग्रही आहेत हे ठावूक असूनसुद्धा सोडून देण्यात आले. सर्वांनाच बेदम मारहाण झाली होती.

आदिवासी स्वातंत्र्यसैनिक

मंडूर गावचे लोक त्यावेळी कुमेरीसाठी जंगलात येऊन तिथेच रहायचे. दुलो कुट्टीकर रामदास प्रभूंना घेऊन तिथे गेले. त्यांच्या आईने ‘सातना साली’ने उकळलेल्या पाण्याची त्यांना आंघोळ घातली. गावच्या लोकांनी आपल्या पदरचे एक-दोन आणे एकत्र करून रामदासभाऊंना बससाठी पैसे दिले व त्यांची गावात पाठवणी केली.

रामदासभाऊ आता मुंबईला असतात. परवा फोनवर या प्रसंगाची आठवण सांगताना ते सहज बोलून गेलेः “स्वातंत्र्यलढ्याच्या कार्यासाठी जाताना आम्हाला घरी थापा माराव्या लागत. शिक्षण असूनसुद्धा आमच्या समाजात स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा नव्हता. परंतु त्या अशिक्षित आदिवासींमध्ये स्वातंत्र्याची जी प्रेरणा होती ती वाखाणण्यासारखी. बायका-मुलांसह संपूर्ण गावच स्वातंत्र्यसैनिक झाला होता.”

गोव्याच्या आदिवासींनी बिरसा मुंडाची स्वातंत्र्यलढ्याची परंपरा पुढे नेली. हे चित्र बिरसा मुंडाचे.

पणजीतील या सत्याग्रहाच्या घटनेतून गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांमध्ये, आणि खास करून विद्यार्थी व युवकांमध्ये नवचैतन्याची लाट उसळली. थोडासा घाबरलेला गोव्याचा स्वातंत्र्यलढा पुनश्च उर्जितावस्थेत आला. 

प्राणांची पर्वा न करता थेट पणजीतील पालाशीला धडक देणाऱ्या या निर्भय तरुणांचे नेते होते आमचे नरसिंहमामा आणि दुलो कुट्टीकर. त्यांना आणि काणकोण व खास करून मंडूरच्या कष्टकरी आदिवासींच्या त्यागाला शतशः प्रणाम!!!

 

संदर्भः

स्वातंत्र्यसैनिक मनोहर प्रभुदेसाई, नरसिंह प्रभू व रामदास प्रभू यांच्याशी झालेली बातचीत

स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास (मनोहर हिरबा सरदेसाई)

गोवा स्वातंत्र्यलढ्यातील काणकोणचा सहभाग

द लिबरेशन ऑफ गोवा (डॉ पुंडलिक गायतोंडे)

हूस हू ऑफ फ्रीडम फायटर्स

 

(हा लेख 9 जुलै 2023 च्या लोकमत, गोवा आवृत्तीमध्ये प्रसिद्ध झालेला आहे)Your email address will not be published. Required fields are marked *