मागच्याच आठवड्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे पुढारी व 1999 पासून लागोपाठ सहा वेळा मडकई मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले सुदिन ढवळीकर यांचा भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळात समावेश करणारा शपथविधी संपन्न झाला. ढवळीकरांनी मगो पक्षाला ‘स्टेपनी’ करून टाकलेले आहे. ती काँग्रेसच्या गाडीलाही लागते आणि भाजपाच्याही. वारे येईल तसे सूप धरीत ढवळीकर कोणतीही लाजलज्जा न बाळगता कोणाच्याही कळपात घुसतात व सत्तास्थानी स्थानापन्न होतात. त्यात कहर म्हणजे भाजपासोबत जाताना अथवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचाशी युती करताना ते सहज बोलून जातातः “शेवटी भाजपा व मगो हे तसे समविचारीच आहेत.” म्हणजे मगो पक्षही हिंदुत्ववादी विचारांचा समर्थक पक्ष आहे हाच त्याचा अन्वयार्थ. मगो पक्षाविषयीची ही भावना हे ऐतिहासिक सत्य आहे, की इतिहासाशी प्रतारणा? काय आहे पूर्ण सत्य?
जाती-धर्मावर आधारित पक्ष नकोः भाऊ
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थापना झाली त्या घटनेला मागच्या आठवड्यात 6 एप्रिल रोजी 59 वर्षे पूर्ण झाली. 1963 साली म्हार्दोळ येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्रवादी गोमंतक संघटना म्हणून त्याची स्थापना झाली होती. गोव्याच्या पहिल्या विधानसभा निवडणुकांच्या केवळ सहा महिने पूर्वी. नंतर तो मगो पक्ष बनला. भाऊसाहेब बांदोडकर या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यापूर्वी काही दिवस आधी मडगावातील एक उद्योजक तुकाराम लोलयेकर यांच्या घरी एक गुप्त बैठक झाली होती. गोमंतक मराठा समाजाच्या क्रांतीकारी चळवळीचे जनक राजाराम पैंगीणकर, समाजाचे तत्कालीन अध्यक्ष नारायण कारवारकर, भालचंद्र काणकोणकर व स्वतः बांदोडकर एवढीच मंडळी होती. गोव्यातील भाटकारशाही संपवून कसेल त्याची जमीन करायची व सर्वधर्मीय कष्टकरी बहुजनांचे राज्य स्थापन करायचे या ध्येयाने प्रेरित झालेली ही सुजाण, सुशिक्षित व परिवर्तनवादी मंडळी होती. त्यावेळी गोव्यात बहुतांश भाटकार ब्राह्मण होते, काही क्षत्रिय होते. तेव्हा एकाने सुचवले, मद्रासमधील जस्टिस पार्टीच्या धर्तीवर आपण ब्राह्मणविरोधी पक्ष स्थापन करुया. या प्रस्तावाला भाऊंनी कडाडून विरोध केला. समाजात फूट पडेल अशी कोणतीही कृती आपण करता कामा नये ही त्यांची धारणा होती. बहुजनांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना अन्याय करणाऱ्यांविरुद्ध दंड थोपटणे अपरिहार्य आहे. परंतु त्याला कोणत्याही जातीचा व धर्माचा मुलामा देऊन समाज दुभंगेल असा पक्ष नको हे त्यांचे ठाम धोरण होते. त्यातूनच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा जन्म झाला.
फुले-शाहू-आंबेडकर-रॉय
याला कारणीभूत होता बांदोडकर व इतर समविचारी मंडळीवर असलेला खास करून महाराष्ट्रातील सुधारक व परिवर्तनवादी पुढाऱ्यांचा प्रभाव. विशेष करून समाजवादी व मार्क्सवादी विचारांचा प्रभाव. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते त्या काळात भाऊ मानवेन्द्रनाथ रॉय यांच्या रॅडिकल ह्युमनिझमने प्रभावित झाले होते. मार्क्सवादाच्याही पुढे जाऊन मानवतावादाचा पुरस्कार करणारी ही विचारसरणी भाऊंना प्रभावित करून गेली होती. त्यांच्यासोबत या विचारसरणीचा पुरस्कार करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण जसे होते तसेच गोव्यातील स्वातंत्र्यसैनिक श्यामराव मडकईकर हेही होते. भाऊंचे ते वैचारिक गुरू होते. हल्लीच दिवंगत झालेले वरिष्ठ पत्रकार सीताराम टेंगसे सांगतात त्यानुसार रॉयिझम म्हणजे मानवी संवेदनांचा आदर करणे, विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणे, प्रत्येक व्यक्तीच्या कार्यक्षमतेचा व श्रमप्रतिष्ठेचा गौरव करणे आणि जाती, पंथ वा धर्मविरहित अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. एके काळी मगोचे खासदार बनलेले दिवंगत अॅड अमृत कांसार यांच्या मते भाऊसाहेब बांदोडकरांवर रॉयिझमइतकाच महाराष्ट्रातील परिवर्तनवादी सुधारक विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचाही तेवढाच प्रभाव होता. या सर्वांतून हे रसायन घडले व ते गोव्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यांना गोव्याचे भाग्यविधाते म्हणतात ते याच विचारसरणीतून त्यांनी अवलंबिलेल्या बहुजनवादी धोरणांसाठी.
बहुजन म्हणजे नक्की कोण?
याबाबत यशवंतराव व भाऊसाहेब हे समांतर विचारसरणीचे पुढारी दोन्ही राज्यांना मिळाले. शिवाय ते दोघेही होतेच जिवश्चकंठश्च मित्र. मागच्याच महिन्यात 19 मार्चच्या साधना या साप्ताहिकात कोल्हापूरचे सहदेव चौगुले-शिंदे यांचा ‘परिवर्तनवादी यशवंतराव चव्हाण’ हा लेख प्रसिद्ध झालेला आहे. या अभ्यासपूर्ण लेखात शेवटी ते सांगतातः “महाराष्ट्रात ‘बहुजन समाज’ या शब्दाबद्दल गैरसमज पसरत असताना त्या शब्दाची व्याख्या यशवंतरावांनी इतकी व्यापक केली की समाजातील सर्व घटक त्या व्याख्येत चपखलपणे बसू शकले. ‘ज्यांची सुखदुःखे समान आहेत तो समाज म्हणजे बहुजन समाज’ अशी व्याख्या त्यांनी केली होती.” बहुजन समाजाची अचूक हीच व्याख्या भाऊसाहेबांचीही होती. त्यातूनच त्यांनी गोव्यात निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व देताना वा मंत्रिमंडळातही बहुजन फॉर्म्युला राबवला. आणि हाच दृष्टिकोण ठेवून काँग्रेसच्या गोव्यातील नेतृत्वाच्या दुटप्पी धोरणाला आव्हान दिले.
मगो पक्षाने अवध्या सहा महिन्यात पक्ष स्थापन करून गोव्यातील पहिली विधानसभा निवडणूक जिंकतानाच प्रस्थापित काँग्रेसला अक्षरशः धूळ चारली. त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. उलट काँग्रेसमधील कित्येक पुढारी मगोमध्ये सामील होऊन निवडून आले. त्यात स्वातंत्र्यसैनिक होते, ब्राह्मण धरून इतर सर्व जातीतील परिवर्तनवादी कार्यकर्ते होते, हिंदू, ख्रिश्चन तसेच मुस्लिमही होते आणि अगदी सामान्य शेतकरी वा व्यावसायिकसुद्धा होते. ही निवडणूक जिंकून सत्तेत येताना मगो पक्षाने स्वतःचा वेगळा जाहीरनामा तयार केला नव्हता. काँग्रेसचा जाहीरनामा हाच आपल्या पक्षाचा जाहीरनामा आहे अशी जाहीर घोषणाच केली होती. केवळ गोवा महाराष्ट्रात विलीन करण्याच्या प्रश्र्नावर दोन्ही पक्षांमध्ये दुमत होते तेवढेच.
तीसातील 16 जागा जिंकल्यानंतरसुद्धा भाऊसहित कोणत्याही आमदार व खासदाराने काँग्रेसची अवहेलना केली नाही. उलट मगोचा हा विजय हा सर्वार्थाने भारताचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंचा विजय आहे असे गर्वाने सांगितले होते. मगोच्या पाठिंब्यावर खासदार म्हणून निवडून आलेले प्रजा समाजवादी पक्षाचे खासदार व स्वातंत्र्यसैनिक पीटर आल्वारीस यांनी लोकसभेत नेहरूंवर विनाकारण टीका केली म्हणून 1967 मध्ये झालेल्या दुसऱ्या निवडणुकीत बांदोडकारांनी समाजवाद्यांशी केलेली युती तोडली होती. धेंपे वा देशप्रभूंसारख्या पोर्तुगालशी निष्ठा दाखवणाऱ्या गब्बर भाटकारांना उमेदवारी दिलेल्या पुरुषोत्तम काकोडकरांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील काँग्रेसला त्यावेळची ही दुसरी निवडणूक लढविण्याचे धाडसदेखील झाले नव्हते.
बहुजन फॉर्म्युलाच्या आधारे महाराष्ट्रात यशवंतरावांनी व गोव्यात भाऊसाहेबांनी मोठ्या कुशलतेने राज्य चालविले. परंतु मुंबई व पणजी यामध्ये फार मोठा फरक होता. त्यामुळे एवढा मोठा व्हिजनरी नेता असूनसुद्धा यशवंतरावांएवढा भाऊंचा गवगवा झाला नाही. परंतु खास करून जनमत कौलातून गोवा महाराष्ट्रात विलीनीकरण करण्याच्या प्रश्र्नावर पडदा पडल्यापासून भाऊंनी ज्या पद्धतीने शासन व प्रशासन चालविले त्याचा सखोल अभ्यास आजच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनीसुद्धा करण्यासारखा आहे. म्हणूनच तर जनमत कौल हरल्यावर केवळ तीन महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुजाण गोंयकारांनी जनमत कौल जिंकलेल्या युनायटेड गोवन्स पक्षाला परत विरोधी बाकांवर बसवून विलीनीकरणवादी भाऊंना सत्तास्थानी बसविले होते. तो इतिहास तर फारच रोमांचकारक आहे.
ख्रिश्र्चनधर्मीय मगोच्या बाजूने
1972 मध्ये तिसरी निवडणूक झाली तोपर्यंत कसेल त्याची जमीन या तत्वावर भाटकाराचे कूळ असलेले शेतकरी शेतीच्या उत्पादनातील केवळ एक षश्टांश वाटा भाटकाराला देऊन इतर उत्पादनाचा लाभ मिळवालला लागले होते. जमिनींचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर आपणच आपल्या जमिनीचे मालक होणार याविषयी हिंदू तसेच ख्रिश्चन समाजातील कष्टकरी शेतकऱ्यांची पक्की खात्री झाली होती. त्यामुळेच तिसऱ्या निवडणुकीत मगोचे संख्याबळ 16 वरून 18 वर गेले होते. खास करून ख्रिश्चन समाजातील बहुतांश उपेक्षित गावडा समाज भाऊंच्या मागे उभा राहिला होता. इतरही ख्रिश्चन धर्मीय मगोच्या बाजूने झुकू लागले होते. 12 ऑगस्ट 1973 रोजी अचानक ह्रदयविकाराचा झटका येऊन भाऊंचा मृत्यू झाला व एक परिवर्तन पर्व संपले. त्याच दिवसात मगो पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यावर भाऊ व काँग्रेसचे केंद्रीय पुढारी उमाशंकर दिक्षीत यांच्यातील बोलणी यशस्वी झालेली होती. जास्तीत जास्त उमेदवाऱ्या बहुजन समाजातील लोकांना दिल्या पाहिजेत व ख्रिश्र्चनांना मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळायलाच हवे या भाऊंच्या अटी त्यांनी मान्य केल्या होत्या. कारण भाऊंच्याही प्रत्येक मंत्रीमंडळात (केवळ तीन मंत्र्यांचे) एक मंत्री ख्रिश्र्चन असायचाच. तोच तर त्यांचा यशस्वी बहुजन फॉर्म्युला होता.
पुढे शशिकला काकोडकर मुख्यमंत्री झाल्यावर 1974 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत मगोचे उमेदवार लुता फेर्राव यांनी तर चक्क ख्रिश्र्चनांचे प्राबल्य असलेल्या बाणावली मतदारसंघातून युगोचे उमेदवार डॉ विल्फ्रेड डिसोझांचा पराभव केला होता. 1980 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शशिकलाताईंनी मगो काँग्रेसमध्ये विलीनही केला होता. शेवटच्या क्षणी रमाकांत खलप व बाबुसो गावकर या दोघा तरुण आमदारांनी माघार घेतली व मगोचे अस्तित्व कायम राहिले. पुढे शशिकलाताईही काँग्रेसमधून बाहेर पडल्या. कारण तोपर्यंत युनायटेड गोवन्स पार्टीचे बाबू नायक व विल्फ्रेड डिसोझासारख्या नेत्यांनी काँग्रेस काबीज केली होती. त्यांचे आपसात पटले नाही. परंतु मगो पक्षाची समाजवादी विचारसरणी काही बदलली नाही.
कुठे चुकले भाऊ?
भाऊंची घोडचूक झाली ते एकच. कसेल त्याची जमीन या तत्वाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे त्यावेळचे भारतातील एकमेव राज्य होते. तेव्हा अनंत काळ गोव्यात चालू असलेली भाटकारशाही नष्ट व्हायची असेल तर गोवा महाराष्ट्रात विलीन व्हायला हवा अशी भुमिका घेऊन मगो पक्षाची स्थापना झाली. या मतप्रणालीचा स्वातंत्र्यसैनिकांमधील ‘नॅशनल काँग्रेस गोवा’चा गट पां पु शिरोडकरांच्या नेतृत्वाखाली मगो पक्षात सामील झाला. त्यामागील मूळ धारणा होती मराठी ही आमची मातृभाषा आहे व कोंकणी तिची बोली. गोव्यात त्याकाळी 38 टक्के असलेल्या ख्रिश्र्चन समाजाला मराठीशी काहीही देणेघेणे नव्हते. शिवाय विलिनीकरण झाल्यास हा समाज महाराष्ट्रात केवळ दोन टक्क्यांवर घसरला असता. त्यातूनच गोवा वेगळे राज्य म्हणून टिकवून ठेवण्यासाठी युनायटेड गोवन्स पार्टीची स्थापना झाली. भाटकारशाही नष्ट होण्यास विरोध करणारे छोटे-मोठे भाटकार या पक्षाच्या बाजूने उभे राहिले. त्यातून मगो हा केवळ हिंदू बहुजन समाजाचा पक्ष आहे अशी धारणा दृढ झाली. पुढे जनमत कौलातून गोवा वेगळा राहिला. भाऊंनी स्वतः हा निर्णय मान्य केला. जनमत कौलात पराभूत केलेल्या गोंयकारांनीही पु्ढच्या विधानसभा निवडणुकीत भाऊंच्या मगोलाच परत बहुमत मिळवून दिले. त्यानंतर विधानसभेत युगो पार्टीने गोव्याला आता घटक राज्याचा दर्जा द्यावा असा ठराव मांडला तेव्हा मगो पक्षाने त्याला पूर्ण पाठिंबा दिला. जनमत कौलानंतर विलीनीकरणावर भाऊंनी चकार शब्द काढला नाही. आपली मागणी चुकीची होती व त्यामुळेच ख्रिश्र्चन समाज आपल्या पक्षापासून दूर झाला याविषयी त्यांची खात्री झाली होती. परंतु मगो हा केवळ हिंदू बहुजन समाजाचा पक्ष आहे ही भावना गोंयकारमध्ये रुजली ती कायमचीच.
मात्र मगो पक्षाची खरी घसरण सुरू झाली ती मगोचे पुढारी एकेक करून काँग्रेसवासी व्हायला लागले तेव्हापासून. त्यामुळे अस्तित्वाच्या लढाईत तत्कालीन मगो पुढारी रमाकांत खलप व डॉ काशिनाथ जल्मींनी आणखीन एक घोडचूक केली. 1994 च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीशी युती केली. तोपर्यत पूर्वीचा जनसंघ असो वा आणिबाणीनंतरचा भाजपा, त्यांना दोन टक्क्यांहून जास्त मते कधीच मिळत नसत. मात्र रामजन्मभूमीचा वाद उफाळला आणि मगोच्या संधीसाधू राजकारणाला कंटाळलेला हिंदू बहुजन समाज भाजपाच्या बाजूने झुकू लागला. 1994 च्या निवडणुकीत मगोच्या पाठिंब्याने भाजपाचे चार आमदार निवडून आले. मनोहर पर्रीकार नावाचे नवे तुफान विधानसभेत रणकंदन माजवू लागले. लोक भाजपाचे कौतुक करायला लागले. अशावेळी 1999 च्या निवडणुकीत भाजपाने अगदी शेवटच्या क्षणी पूर्णतया बेसावध व आत्ममग्न असलेल्या मगोशी असलेली युती तोडली व आपल्या आमदारांची संख्या चारांवरून दहांवर नेली. पुढे ती वाढतच गेली व ख्रिश्र्चन समाजालाही आपणामध्ये सामील करून घेऊन गोव्याच्या भाजपाने 2012 च्या निवडणुकीत 21 जागांपर्यंत मजल मारून आपले सत्तास्थान पक्के केले. या राजकारणात पूर्णतया संपला तो मगो पक्ष. स्वतः खलपसुद्धा भाजपात काही काळ सामील झाले. परंतु त्या हिंदुत्ववादी वातावरणात तेही टिकले नाहीत आणि भाजपाने या समाजावादी विचारांच्या नेत्याला कधी जवळही केले नाही. पुढे तेही काँग्रेसमध्ये गेले आणि डॉ जल्मीही.
मगो झाला संधीसाधू ‘स्टेपनी’
या राजकीय घडामोडींच्या गडबडीत 1999 मध्ये पहिल्यांदा निवडून आलेल्या सुदिन ढवळीकरांनी गलितगात्र झालेल्या मगोच्या सिंहावर आपल्या निधीची आयाळ चढवली व मगो त्यांनी जणू आपली खाजगी मालमत्ताच कशी केली. कित्येक मगोनिष्ठांनी तात्विक विरोध वगैरे केले. परंतु निधीचा खजिना ढवळीकरांकडे असल्याने कुणाचीच डाळ शिजू शकली नाही. परवा परवापर्यंत मगोशी एकनिष्ठ असलेल्या रत्नकांत म्हार्दोळकरांनी देखील आपली हतबलता मान्य करुन पक्षाचा राजिनामा दिला. आज ढवळीकर बोले आणि मगो चाले अशी स्थिती झालेली आहे. त्यात भाऊंचा समाजवाद, रॉयिझम, फुले-आंबेडकरवाद यातील अक्षरशः काहीही राहिलेले नाही. उलट दहशतवादाचे आरोप असलेल्या हिंदुत्ववादी सनातन संस्थेशी ढवळीकरांचे असलेले सख्य जगजाहीर आहे. मात्र मूलतः मगो पक्षावर आज सत्ता गाजवतोय तो केवळ संधीसाधूवाद!
हा आहे मगो पक्षाचा खराखुरा इतिहास. समाजवाद, रॅडिकल ह्युमनिझम, बहुजनवाद वगैरे गोष्टींशी दूरान्वयानेही संबंध नसलेले लोक आज या पक्षात आहेत. काही हरकत नाही. शेवटी लोक याच संधीसाधू पुढाऱ्यांना परत परत निवडून देतात. सर्व प्रकारच्या लोकशाही तत्वांना ‘चुट्टी’ लावून कुणाशीही संग करण्याच्या त्यांच्या कृत्यांचा लोकच जयजयकार करतात. आपला आमदार मंत्री झाला म्हणून बेहोष होऊन नाचतातुसद्धा. तेव्हा उगाच त्यावर हरकत घेण्याचा आम्हाला काय अधिकार? आपणास हवा तोच प्रतिनिधी निवडून देण्याचा या लोकशाहीत लोकांना पूर्ण अधिकार आहे व तो आपण लोकशाही वृत्तीने मान्यही करायला हवा.
मात्र एकच कळकळीची विनंती आहे. मगो पक्ष विभाजनवादी असलेल्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या भाजपाचा समविचारी पक्ष आहे से वक्तव्य मात्र त्यांच्या पुढाऱ्यांनी करू नये. आपण भाऊसाहेबांच्या मगो पक्षाशी एकनिष्ठ आहोत अशीही शेखी मिरवू नये. कारण ती केवळ पक्षांच्या मूळ तत्वांशी नव्हे, आपणा सर्वांना परमपूज्य असलेल्या भाऊसाहेब बांदोडकरांशी केलेली प्रतारणा ठरेल. कारण आजच्या मगो पक्षाला भाऊंशी वा त्यांच्या विचारप्रणालीशी काहीही म्हणजे अक्षरशः काहीही देणेघेणे नाही. बस्स, एवढीच विनंती विशेष. रागलोभ द्यावा घ्यावा. सप्रेम नमस्कार. जय गोमंतक!