स्वर्गीय विजयकुमार नाईक लिखित व रुद्रेश्वर पणजी निर्मित गाजलेल्या ‘पालशेतची विहीर’ या नाटकाचा प्रयोग येत्या शनिवार दि 5 एप्रिल 2025 रोजी काणकोण तालुक्यातील मनोशोभा कलाघरात संपन्न होणार आहे.
चार वर्षांपूर्वी स्वतः विजयकुमार नाईक यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचे प्रयोग गेली दोन-तीन वर्षे असंख्य कारणांस्तव बंद पडले होते. ते नाटक नव्या स्वरुपात श्री दिपक आमोणकर यांनी पुनर्दिग्दर्शित केलेले आहे.
त्याचा प्रयोग दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य अकादमीने गोव्यात आयोजित केलेल्या भारत रंग महोत्सवातही यंदा जानेवारी महिन्यात करण्याचा मान रुद्रेश्वर पणजी या संस्थेला प्राप्त झाला होता.
त्यापूर्वी कला अकादमीच्या अ गट मराठी नाट्यस्पर्धेत व महाराष्ट्रातही या नाटकाने प्रथम पुरस्कारासहित इतर आठ वैयक्तिक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत.
‘पालशेतची विहीर‘ हे मराठी नाटक आद्य मराठी नाटककार स्व. हिराबाई पेडणेकर यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित आहे. देवदासी समाजातील प्रतिभावंत कलाकार व नाट्यलेखक असलेल्या हिराबाईंना एक यशस्वी नाट्यलेखक, गीतकार व गायक म्हणून कलाक्षेत्रात स्वतःला प्रस्थापित करताना, पुरुषप्रधान संस्कृतीचे व उच्चवर्णीय प्रवृत्तीचे चटके खात कसे जीवन कंठावे लागले याचे विदारक दर्शन या नाट्यकृतीतून केलेले आहे. त्याचबरोबर 19 व्या शतकातील रुढी-परंपरावादी सामाजिक परिस्थितीतसुद्धा सुधारणावादी दृष्टिकोन बाळगून हिराबाईंनी महिला सशक्तीकरणाची उभारलेली मुहूर्तमेढही या नाट्यकृतीतून प्रभावीरित्या सादर केलेली आहे. हा केवळ एका महिलेचा संघर्षमय इतिहास नव्हे, तर संपूर्ण महिलावर्गाला नवीन उर्जा प्राप्त करुन देणारा एक नाट्याविष्कार आहे असे श्री आमोणकर म्हणतात.
गोव्यातील देवदासी मुक्ती चळवळ ही आपल्या देशातील सर्वात यशस्वी शांततापूर्ण क्रांती म्हणून ओळखली जाते. या चळवळीची मुहूर्तमेढ काणकोण तालुक्यातील पैंगीण व लोलये गावात रोवली गेली होती. त्यामुळे काणकोणमध्ये आयोजित केलेल्या या नाट्यप्रयोगाला अनन्यसाधारण महत्व आहे.
या नाट्यप्रयोगाला खास करून महिला व तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावावी असे आवाहन मनोशोभा कलाघराचे सचिव सुदेश प्रभुदेसाय यांनी केले आहे.
हा नाट्यप्रयोग शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजता काणकोणच्या लोलये गावातील आगस वाड्यावर स्थापन केलेल्या मनोशोभा कलाघरात संपन्न होणार आहे.
या नाटकाविषयी व तेथे कसे पोचावे याविषयी आणखीन माहिती हवी असल्यास इव्हँटगोवा.कॉम या वॅबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करू शकता.