दर्पण आणि दिग्दर्शन

‘दर्पण व दिग्दर्शन’ भूमिकेतच समाजाचे हित

‘दर्पण व दिग्दर्शन’ भूमिकेतच समाजाचे हित

मराठी पत्रकारितचे जनक असे संबोधले जाते, त्या बाळशास्त्री जांभेकर या २१ वर्षांच्या तरुणाने १८३२ मध्ये ‘दर्पण’ नावाचे साप्ताहिक वृत्तपत्र पुरू केले आणि नंतर पाच वर्षांनी ‘दिग्दर्शन’ नावाचे मासिक सुरू केले. ती दोन्ही नावे इतकी समर्पक आहेत की, पावणेदोनशे वर्षांनंतरही वृत्तपत्राचे (आणि एकूणच सर्व प्रकारच्या माध्यमांचे) काम काय, या प्रश्नाचे उत्तर ‘दर्पण’ व दिग्दर्शन’ या दोनच शब्दांत सांगता येईल. समाजातील बऱ्या-वाईट गोष्टींचे प्रतिबिंब वर्तमानपत्रात उमटायला हवे. पण त्याचबरोबर लोकमानसाच्या तत्कालीन भावनिक लाटेत, तर्कयुक्तता, निष्पक्षता अबाधित ठेवून समाजाला दिशा दाखवणे, प्रसारमाध्यमांच्या या दोन कर्तव्यांविषयी कोणाचेही दुमत असणार नाही. मग या दोन निकषांवर पत्रकारितेच्या प्रवृत्ती, प्रवाहांवर नजर टाकल्यास काय हाती लागते आणि जे हाती लागते, त्याला काय कारण, याची पडताळणी करणे केवळ पत्रकारांचे काम नाही; तर समाजातील सर्व बुद्धिजीवी लोकांनी यावर विचार करायची वेळ येऊन ठेपली आहे. कारण एकाच दिवशी काही तासांतच काही लाख (देशभरातील प्रमुख वृत्तपत्रांचे एकूण वाचक काही कोटी आहेत) वाचक वृत्तपत्राला लाभत असतात. काही तासांतच जनमानस तयार करण्याचे (वा बिघडवण्याचे) काम ही प्रसारमाध्यमे करत असतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता ही ध्येयवादी पत्रकारिता होती. त्या काळाविषयी आपल्या मनात अजूनही सुप्त आकर्षण असलेले दिसून येते. पण त्यानंतर माध्यमांमध्ये इतकी स्थित्यंतरे झाली आहेत की ध्येय, व्यवसाय हे टप्पे पार करून हा शुद्ध स्वरूपाचा ‘धंदा’ बनला आहे. यांचीही तक्रार असण्याचे कारण नव्हते. पण महात्मा गांधी यांनी सात पातके सांगितली आहेत, त्यात Commerce without ethics हे पातक सात पातकांमध्ये अंतर्भूत आहे. पत्रकारितेचे चालचलन बघितल्यावर असे काही घडलेलेच नाही, असे आपण म्हणू शकत नाही.
स्वातंत्र्यानंतर सरकारी योजनांचा, धोरणांचा प्रसार करणे पत्रकारितेने आपले कर्तव्य मानले. त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आणि विशेषतः त्यातील नेत्यांनी पत्रकारितेमध्ये शिरकाव केला. पण यात चांगली बाजू ही होती की, वाचकांना, ग्राहकांना आपण कुठल्या विचारधारा, मतप्रणाली, भोवतालच्या परिसराचे आकलन करून घेत आहोत याची जाणीव होती. त्यातही माफक प्रमाणात का होईना विरोधी मत, दृष्टिकोनाला जागा होती. पण ही परिस्थिती झपाट्याने पालटली. विचार, बातमी आणि जाहिरात याची सरमिसळ एवढी वाढली आहे की, आपण लेख वाचतोय की सजावट न केलेली जाहिरात वाचतोय, असा प्रश्न पडावा. कधी कधी तर वर्तमानपत्राचे काम ‘मनोरंजन’ करणे एवढेच राहिले का? असेही वाटते. बातम्यांची पेरणी अशी की, ज्यातून मनोरंज‌न होईल. याला काही जण infotainment असेही म्हणतात. म्हणून समाजातील गंभीर प्रश्न, दुबळ्या घटकांच्या समस्या, या गोष्टींना कुठला वाचक वर्ग मिळणार आणि या बातम्या वाचून कुणाचे मनोरंजन होणार. पत्रकारिता निष्पक्ष असायला हवी, हे घोषवाक्य आपण नेहमीच ऐकतो. पण याचा अर्थ पत्रकारिता लोकांच्या बाजूने असायला हवी. पत्रकारिता मुक्या जनतेचा आवाज बनली पाहिजे. खरे पाहता, असा आग्रह आता समाजातील वाचक वर्गाचा राहिला पाहीजे. तो राहिलेला नाही. टीव्हीवरच्या सासू-सुनेच्या मालिका, चित्रपट, आयपीएलचे सामने ज्या उद्दे‌शाने पाहिले जातात, त्याच उद्देशाने टीव्हीवरच्या बातम्या, चर्चा पाहिल्या जातात. एखाद्या घटनेला धर्म, देशभक्ती, पाकिस्तान याची फोडणी देत आपले मनोरंजन केले जाते. मागे ‘इंडिया’ आघाडीने काही दूरचित्रवाणीवरील पत्रकारांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला. या गोष्टीचे स्पष्टीकरण करताना त्यांनी म्हटले की, हे पत्रकार पक्षपात करतात. सत्ताधारी लोकांच्या तुलनेत बोलायला, भूमिका मांडायला वेळ देत नाहीत. त्यांच्याच भाषेत सांगायचे झाल्यास, समाजात तेढ, वैमनस्य निर्माण होईल असे विषय हेतूपुरस्सर निवडून त्यावर एकतर्फी चर्चा घडवून आणतात. एखाद्या नाटकामध्ये पात्र, प्रसंग, संवाद यांची रचना केलेली असते, तशाच प्रकारची मांडणी करून ‘नफरत की दुकान’ चालवत आहेत. वेगवेगळ्या वाहिन्यांवर चर्चेचा विषय व होत असलेली मांडणी पाहता यात तथ्य नाही, असे आपण म्हणू शकत नाही. गंमत म्हणजे, ज्या पत्रकारांवर आक्षेप घेतले, त्यांनी या आक्षेपांचे खंडन केले नाही. उलट असा बहिष्कार टाकल्याने आपल्या कामाची पोचपावती मिळाली, असे त्यांना वाटते. अशा प्रकारचे बहिष्कार शस्त्र पत्रकारांवर उचलावे का? यावर विवाद होऊ शकतात, पण विरोधी पक्षाच्या आघाडीने उपस्थित केलेले मुद्दे गैरलागू नव्हते, हे पराक्रमी पत्रकारांनी सिद्ध केले. एखाद्या घटकाविषयी सतत कुणीतरी चांगले बोलले पाहिजे असे नाही. पण पत्रकारितेवर सत्ताधारी खुश आणि विरोधक नाराज असेल तर निश्चितच गंभीर आहे.
प्रसारमाध्यमांची ही अवस्था असताना सोशल मीडियाने सामान्य लोकांना मोठे व्यासपीठ मिळवून दिले आहे. सोशल मीडियाद्वारे फेक न्यूज पसरते हे खरेच, पण त्याचबरोबर त्या फेक न्यूजची पोलखोल करणारी अल्टन्यूज नावाची वेबसाईट काही तरुणांनी सुरू केली आहे. विशेष म्हणजे याचा खर्च लोकवर्गणी, लोकसहभागातून केला जातो. ध्रुव राठी या तिशीतील तरुणाच्या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर कोटीपेक्षा जास्त आहेत. समाजातील काही गंभीर विषयांवर प्रचंड संशोधन करून आपल्या चॅनेलवर तो मांडणी करत आहे. याचा अर्थ १०० वर्षांपूर्वीची पत्रकारिता राहिली नाही, हे खरे आहे. पण त्याचबरोबर हातात असलेल्या मोबाईलने आम्हा सगळ्यांनाच पत्रकार बनवले आहे, हेही तितकेच खरे! त्यामुळे सोशल मीडियावरील बोटे अधिक जबाबदारीने फिरायला हवीत.
एखादे छोटेसे, काही हेतूने मासिक चालवत असेल तर ‘लंगोटी पत्र’ म्हणून त्याची हेटाळणी न करता त्याच्या पाठीशी राहिले पाहिजे.
तंत्रज्ञानाने प्रसारमाध्यमांची मक्तेदारी मोडून टाकली आहे. त्याचा आधार घेऊन समाजात जागल्याची भूमिका घेणारे आपल्या परीने प्रयत्न करताहेत. या बिनभांडवली प्रयत्नांना समाजमनातून पाठिंबाही मिळत आहे. कारण समाज सदासर्वकाळ दुय्यम गोष्टींवर जगू शकत नाही. ‘टिळक-आगरकर’ हे पत्रकारितेतील स्वरूप येण्याची शक्यता नसली तरी ‘दर्पण व दिग्दर्शन’ ही भूमिका राहावी यासाठी सामान्य जनता माध्यमांवर दबाव आणू शकते आणि तसे न घडल्यास तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपली वाट तयार करू शकते. तसे करण्यातच समाजाचे हित आहे.
……
कुलदीप कामत,

Your email address will not be published. Required fields are marked *