दृष्टांत घडविणारी माझी आसामवारी!

जी. ए. कुलकर्णी यांच्या एका कथेतील पात्र म्हणतं, “तू काही शेकडो मैलांचा रस्ता गिळत पर्यटन स्थळांना जाऊन केवळ अंग आदळून येणाऱ्यातला नव्हेच.” खरंच, अशा प्रकारच्या पर्यटनातून आपण अमुक अमुक एक प्रदेश पर्यटनस्थळ म्हणून बघितले, अशा टिकमार्क करण्याच्या प्रवृत्तीवर सुंदर भाष्य केले आहे. अशाप्रकारचे पर्यटन आपल्या मनात जास्त काळ रेंगाळत नाही. एखाद्या प्रदेशाचा फील घेण्यासाठी काही दिवस डोळसपणे त्या प्रदेशात घालवले तर गाठीला काहीतरी लागते. ‘केल्याने देशाटन पंडित’ पांडित्य किती वाढते हे मला माहीत नाही, पण सुमारे बारा वर्षांपूर्वी केलेली आसामवारी मला माणूस म्हणून समृद्ध करणारी ठरली, एवढं मात्र निश्चित.

एक दिवस दुपारी एका शिक्षकाचा मेसेज आला. विचारायला लागला, “गुवाहाटीला येतोस का?” केंद्र सरकारच्या सांस्कृतिक स्रोत आणि प्रशिक्षण केंद्राच्यावतीने शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. गुवाहाटी हा शब्द ऐकल्यानंतर कॉलेजात असताना अ.भा.वि.प. च्या एका मोर्चात दिलेली घोषणा आठवली, ‘गोवा हो या गुवाहाटी, अपना देश अपनी मिट्टी!’ पण या पलीकडे गुवाहाटीबद्दल काहीच वाचल्याचे आठवत नव्हते. कार्यशाळेच्या तारखा बघितल्या तर त्याच दरम्यान आमच्या उच्च माध्यमिक विद्यालयाची नियोजित शैक्षणिक सहल राजस्थान-आग्र्याला जात होती. मेसेजला तसा रिप्लाय पाठवला, पण मनात मात्र गुवाहाटी रुंजी घालत राहिले.

आसामला जाण्याचे आणखी एका कारणासाठी आकर्षण वाटत होते. ते म्हणजे, या ईशान्य भारताला सहसा कोणी भेट देत नाही. सबंध देश किंवा आसपासचे देश फिरलेल्या पर्यटकांना विचारा, त्यांचे उत्तर नकारार्थी असेल. इतकेच नव्हे, तर आपल्याकडची माणसं कलकत्त्यालासुद्धा मोठ्या मुश्किलीने पोचतात. ईशान्य भारताचे अस्तित्व फक्त भूगोलाच्या पुस्तकात जाणवलेले असते. ईशान्य भारतातील सात राज्यांची नावे पटकन सांगा, असे म्हटल्यानंतर आपल्याला एका दमात सगळी नावे सांगता येणार नाहीत. 

आसाम राज्याला ईशान्य भारताचा बॅकबोन (कणा) म्हणतात. कारण उर्वरित सहाही राज्यांच्या सीमारेषा आसामला मिळतात आणि भारतातून अन्य सहाही राज्यात जाण्यासाठी आसाममधूनच जावे लागते. एकदा पुण्यात गेलो असता ‘साप्ताहिक साधना’चा ईशान्य भारतावरील विशेषांक हाती लागला. त्यात विशेष करून राजा शिरगुप्पे यांचा ईशान्य भारतावरील लेख त्या प्रदेशाची सफर करून आल्याचा फील देणारा, त्या त्या भागातील भूप्रदेशाची, माणसांची, समाजाची, संस्कृतीची झलक दाखवणारा होता. या सगळ्या शिदोरीच्या आधारे पुढच्या कार्यशाळेला आसामला जाण्याचे नक्की केले. प्राचार्यांची अनुमती घेतली. ७ मार्च ते १७ मार्च या कालावधीच्या कार्यशाळेला गुवाहाटीला जाण्याचे निश्चित केले व सहप्रवासी, सहधर्मी शोधू लागलो. कित्येकांना सांगून शेवटी पाच-सहा जणांचा ग्रुप झाला. पण शेवटी हो-नाही करता करता मी आणि माझा मित्र नागेश शेट्ये असे आम्ही दोघेच उरलो.

देशाच्या एका कोपऱ्याहून दुसऱ्या कोपऱ्यात जाणे आणि तेही दोघांनीच.. जरा कठीणच वाटत होते. पण सवयीप्रमाणे काही करण्याअगोदर त्याची जाहिरात करून मोकळा झालो होतो; त्यामुळे आता माघार घेणे अशक्य होते. शेवटी सहकाऱ्यांच्या शुभेच्छा झेलत मी व नागेशने गुवाहाटीला जाण्याचे पक्के केले. तीन मार्चला निवडणूक होती, वास्को येथील एका मतदार केंद्रावर माझी नेमणूक झाली होती. निवडणुकीच्या आदल्या रात्री मतदान केंद्रावर मच्छरांचा पाहुणचार घेत दुसऱ्या दिवशी मतदानाची प्रक्रिया पार पडली. खरं म्हणजे, ती ड्युटी करत असताना मन अधून मधून कधीही न पाहिलेल्या, फारसं काही माहीत नसलेल्या गुवाहाटीकडे फेरफटका मारून येत होते.

दुसऱ्या दिवशी वास्कोहून कलकत्त्याकडे जाणाऱ्या रेल्वेच्या टू टायर डब्यात गोव्यातील सर्व वर्तमानपत्रे घेऊन बसलो. मतदानाची टक्केवारी व उत्साह परिवर्तनाची चिन्हे स्पष्ट दिसत होती. आम्ही दोघांनी अलटून पालटून डुलक्या घेतल्या. सर्व पेपर चाळले आणि इकडचे तिकडचे बोलत बसलो. बोलता- बोलता दोघांचा आवाज चढायचा.. तोच पलीकडून शुऽऽ!! व्हायचे. दुसऱ्या वर्गाचे डबे व वातानुकूलित डब्यांच्या वातावरणातील फरक सर्वप्रथम जाणवला. दुसऱ्या वर्गाच्या डब्यात गर्दी, गडबड या नित्याच्याच बाबी. तुम्ही तोंडाला कुलूप घालून बसूच शकत नाही. तुम्ही खुशाल बसाल, पण आपल्या समोरचा, “मे मुंबई जा रहा हूँ! मेरी बहन बिमार है! पिछली साल ही उसकी शादी हुई थी! आप कहाँ जा रहे हो?” असं विचारून तुम्हाला बोलतं करत असतो. तिकीट कन्फर्म नसेल तर तुम्हाला ऍडजेस्ट व्हायला सांगत असतो. तुम्हीसुद्धा त्याच्याशी बोलून या गोष्टीला तुमच्याही नकळत परवानगी दिलेली असते. असो.

दोन दिवसांच्या प्रवासानंतर रेल्वे कलकत्ता स्टेशनकडे हळूहळू सरकत होती. देशाची आणि आता पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता. पश्चिम बंगालचे आकर्षण अनेक कारणांसाठी होते. शालेय स्तरावर आपण आधुनिक भारताचा इतिहास शिकलो, त्यात निम्मा इतिहास केवळ पश्चिम बंगालचा होता. स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, राजाराम मोहन रॉय, रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चटर्जी, सुभाष चंद्र बोस आणि आताच्या काळात सत्यजित रे, अमर्त्य सेन असे भारताचे अनेक सुपुत्र या भूमीने घडवले. भारताच्या इतिहासाचे दैदिप्यमान पर्व घडवण्यात या बंगाली बाबूंचे योगदान वादातीत आहे. यानंतर या राज्याने ३५ वर्षे मार्क्सवादाचा कडवा ध्येयवाद अनुभवला. गाडी अजून सिग्नलवर थांबत थांबत चालली होती. पण आतले संदर्भ त्वरेने जागे होत होते. गाडी हळूहळू पुढे सरकत होती. आता कलकत्ता शहराचे दर्शन व्हायला लागले. मात्र प्रत्यक्ष दर्शनाने मनातील समजुतींचे अपेक्षांचे भोपळे फुटायला लागले. एखाद्या देवतेने शाप दिल्यानंतर एखादी नगरी तिथेच थिजून जावी, तसेच काहीसे या शहराकडे बघून वाटले. जुन्या इमारती, बकाल झोपडपट्टी, सर्वत्र माजलेली अस्वच्छता हे चित्र कलकत्त्याच्या दिव्य इतिहासाशी विसंगत होते. विद्वान, चारित्र्यसंपन्न कम्युनिस्ट राज्यकर्ते लाभूनही ही स्थिती! कुणीतरी म्हटले आहे, ‘कम्युनिजम इज इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉव्हर्टी’

त्या रात्री रेल्वे स्थानकावरील निवासात राहिलो. सकाळी सेलदा स्थानकावरून गोहत्ती गाडी होती. त्यामुळे लगबगीने खाली उतरून टॅक्सी शोधायला लागलो. पण प्रीपेड टॅक्सीसाठी प्रवाशांची भली मोठी रांग लागली होती. एक टॅक्सीवाला धावत आला. (नेहमी प्रमाणे) त्याने दुपटीने पैसे मागितले. (नेहमीप्रमाणे) गाडीची वेळ होत आली होती. मान्य करण्यापासून पर्याय नव्हता. आम्ही दोघे आणि आणखी एकट्याला घेऊन टॅक्सीवाला निघाला. त्याने गाडी कुठल्या रस्त्याने काढली याची कल्पना नाही. पण गाडी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून चालली होती असे वाटले. दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढीग होते. विशेष म्हणजे रस्त्यावर गाडी, बसेसप्रमाणे रेल्वेचे डबे (ट्राम) धावत होते. हे बघून पुढे बसलेला ओरडला, “पैसा वसूल!”

कलकत्त्याच्या या अल्प व दिव्य दर्शनाने भारावलेलो आम्ही गुवाहाटीच्या गाडीत बसलो. आज विधानसभेचा निकाल होता. मोबाईलवरून कळले की निवडणुकीत अनेक दिग्गजांचा निक्काल लागला होता. या परिवर्तनाचे किस्से ऐकत प्रवास चालला होता. त्यानंतर गाडी बिहार राज्यात शिरली. यावेळी गंगा नदीचे झालेले भव्य दर्शन मी कदापी विसरू शकत नाही. या नदीवरील पुलावरून गाडी उणीपुरी पाच ते सात मिनिटे चालली होती. प्रत्येक भारतीयाच्या मनात घर करून राहिलेली गंगा मी प्रत्यक्ष बघत होतो. या तिरावरून त्या तिरावर सहजपणे नजरेच्या परिघात येणाऱ्या आपल्याकडील नद्या. ही गंगा, जीवनदायिनी शांतपणे हजारो गावांना तृप्त करत चालली होती.

संध्याकाळी गाडी सिलिगुडीला पोहोचली. ईशान्य भारत उर्वरित भारताला २० किलोमीटर रुंदीच्या चिंचोळ्या पट्टीने जोडलेला आहे. या पट्टीला सिलिगुडी कॉरिडॉर किंवा चिकन नॅक असे म्हणतात. इथे गाडी बराच वेळ थांबली. रात्र होत होती; सकाळी आम्ही गुवाहाटीला पोहोचणार होतो. दहा दिवस कार्यशाळा व त्यानंतर आसपास फिरण्याचे व परतीचे चार दिवस असे अनोळखी प्रदेशात काढायचे होते. सकाळच्या निवडणूक निकालांचा उत्साह मावळला होता. आणि एकाएकी भडभडून आले. आपण इथे येण्यात काही चूक केली नाही ना, असेही वाटायला लागले. गुवाहाटीला पोहोचल्यानंतर विमान पकडून परत गोव्याला जावे असे तीव्रतेने वाटू लागले. मला माहीत होते असे करणे निव्वळ अशक्य होते, पण त्या क्षणी तसे वाटले खरे.

सकाळी आम्ही गुवाहाटीला म्हणजेच तथाकथित नक्षलग्रस्त राज्यात पोहोचलो. थोडे भांबावून गेलो होतो. पण रेल्वे स्थानकाच्या बाहेर आल्यानंतर ऐकीव गोष्टींचा लवलेशही जाणवला नाही. उंचवट्यावर रेतीच्या पोत्यांचा आडोसा करून एक बंदूकधारी सैनिक टेहाळणी करत होता. बस्स! आणखी काही नाही. आमची कार्यशाळा व मुक्कामाचे ठिकाण शहराच्या किंचित बाहेर असलेल्या कलाक्षेत्र या सांस्कृतिक केंद्रात होते. त्याचा उच्चार ते ‘कला खेत्र’ असा करतात. हा संपूर्ण परिसर आपल्याकडील (जुन्या) कला अकादमीसारखा होता. 

Bishnu Saikia’s Photography

नाव नोंदणी झाली. राहण्याची व्यवस्था बरी होती. आम्हाला देण्यात आलेली मच्छरदाणी लावत असताना शेजारी कोण येतंय याची आम्ही उत्सुकतेने वाट बघायला लागलो. इतक्यात चार जण कॉलेजचे विद्यार्थी शोभतील असे मध्यप्रदेशातील शिक्षक धांगड धिंगाणा करत आले. त्यातील एकटा आला आणि त्याच्या खास प्रदेशातील हिंदी ठसक्यात बोलू लागला. “हम मध्य प्रदेश से है! आप कहाँ के हो भाई! आम्ही म्हटलं, “गोवा.” गोवा म्हटल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. आपल्या सहकाऱ्यांची डोळे मिचकावून तो म्हणाला, “देखो ये बंदे गोवा के है! भाई, बीच के पासही में रहते हो क्या?” गोव्याबाहेर गेल्यानंतर गोवेकर अशी ओळख सांगितल्यावर ही प्रतिक्रिया आता सवयीची झाली आहे. अहमदनगरच्या कार्यशाळेत यासंदर्भात प्राध्यापकांशी मी वाद घातला होता. तसेच काहीतरी खरमरीत बोलावे, असे मला वाटले; पण गप्प राहिलो.

कार्यशाळेला देशभरातून शिक्षक आले होते. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून आलेल्या शिक्षकांमुळे कार्यशाळेचा हॉल मिनी इंडिया बनला होता. आयोजकांनी त्या दिवशी काही सूचना केल्या. त्यात उद्याचा भारत घडविणाऱ्या शिल्पकारांना एक कळकळीची विनंती होती- ‘कृपया रात्री दारू पिऊ नका’. त्यादिवशी हस्तकला शिकवण्यासाठी पाच जणांच्या टीमची ओळख करून देण्यात आली. त्यात एक किडकिडीत बुटका इसम होता. त्याने नाव सांगितल्यावर सगळेजण मोठमोठ्याने हसायला लागले. त्याचे नाव होते दारासिंग!

दुसऱ्या दिवसापासून प्रत्येक राज्याला अर्ध्या तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम करायचा होता. इंग्रजी वर्णमालेनुसार राज्याचा क्रम ठरविण्यात आला. पहिल्या दिवशी आंध्रप्रदेश व आसाम ही राज्ये होती. रविवारी सुट्टी. सोमवारी आमची पाळी होती. कार्यशाळेला यायचे ठरले तेव्हा लोकनृत्य करायचे असा मी विचार केला होता. पण आम्ही इथे केवळ दोघेच होतो. आता आली पंचाईत!! काही प्रेक्षणीय स्थळांचे फोटो दिले होते. एक दोन लोकगीते सादर करून वेळ निभावून नेणे भाग होते.

संध्याकाळी कला क्षेत्राच्या मोकळ्या जागेत कार्यक्रमाची आखणी करत मी आणि नागेश बसलो होतो. तितक्यात मध्य प्रदेशचे तेच सुसंस्कृत शिक्षक आले. “क्या भाई, आप कौनसा प्रोग्राम करोगे? गोवा मे तो सब फिल्मी कल्चर है!” आता मात्र मुश्किलीने सांभाळलेला संयम संपला. मी ताडकन म्हणालो, “ये आपकी गलतफहमी है! आप जैसे लोग ऐसी गंदी सोच लेके गोवा आते है और मार खा के चले जाते हैं! राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यों को बीमार राज्य कहा जाता है! इसकी आप शरम करो! आप हमे संस्कृती के बारे में क्या बतायेंगे? आपके यहा लोक भूके मरते है! यह आपका अहंकार और अज्ञान है जो आपको इस तरह से सोचने पर मजबूर करता है!” असे बरेच काही बोललो. मी नागेशकडे बघितले. त्याच्या चेहऱ्यावर ठळकपणे लिहिले होते, ‘बस आता पुरे’. त्यांनी सुद्धा “रूम पर मिलेंगे” म्हणत काढता पाय घेतला. पण त्यानंतरही नागेशशी मी बराच वेळ बोलत राहिलो. रविवारची सुट्टी मेघालय येथे जाऊन सत्कारणी लावावी असे ठरले. कर्नाटकच्या शिक्षकांबरोबर आम्ही निघालो.

नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या काळात बंगालच्या उपसागरावरून आलेले बाष्पयुक्त वारे व ढग मेघालयाच्या पर्वतीय प्रदेशात घुसतात. तेथील विशिष्ट प्राकृतिक रचनेमुळे बाष्पयुक्त वारे व ढग तिथेच अडवले जाऊन हा पर्वतीय प्रदेश सतत मेघाच्छादित राहतो, म्हणून त्याला मेघालय म्हणतात. येथील भूप्रदेश व हवामानामुळे पूर्वेकडील स्कॉटलंड म्हणूनही ते ओळखले जाते. १९७२ साली मेघालयाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. त्याआधी तो आसाम राज्याचा भाग होता. मेघालय हे स्वतंत्र राज्य होण्यापूर्वी शिलाँग ही आसामची राजधानी होती. 

आम्ही सर्वप्रथम चेरापुंजीला गेलो. तिथे बाराही महिने कधीही पाऊस पडतो. वाटत होतं पाऊस पडावा पण तसं काही झालं नाही. उत्तुंग गिरीशिखरे, खोल दऱ्या या सगळ्यांचा विलक्षण परिणाम जाणवत होता. शिलाँग शहर नैसर्गिक सौंदर्याने नटलेले असले तरी मूलभूत साधनसुविधांचा प्रचंड अभावही जाणवला. रवींद्रनाथ टागोर यांच्या आवडत्या शहरात पर्यटन संस्कृती अजून रुजली नाही असे वाटले. 

त्याच दिवशी आम्ही गुवाहाटीला परत आलो. सकाळी लगबगीने सगळी तयारी केली. हॉलमध्ये जाऊन फळ्यावर गोव्याचा नकाशा काढला. कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक करून नागेशने माईक माझ्या हाती दिला. गोव्याविषयी काय बोलावे याची आखणी प्रवासाला निघण्यापूर्वी ठरली होती. पण इथे आल्यानंतर गोव्याची जुजबी माहिती देणे व्यर्थ आहे असे जाणवले. आल्यावर झालेले नजरेतले स्वागत आठवले. या सगळ्यामधून मीही गोव्याचा शोध घेऊ लागलो होतो. त्या दिवशी मध्य प्रदेशच्या शिक्षकांशी बोलताना काही मुद्दे जाणवले होते. त्यातील त्रागा वगळून विषय मांडण्याचे ठरवले. मी बोलायला सुरुवात केली. अर्थात माझ्या राष्ट्रभाषेतून.

“देशभरातून जमलेल्या शिक्षक मित्रहो, जर तुम्ही तुमच्या शाळेतील एखाद्या विद्यार्थ्याला विचारले की स्वातंत्र्य दिन सांगा? तर तो पटकन सांगेल ‘१५ ऑगस्ट’ पण हाच प्रश्न तुम्ही गोमंतकीय विद्यार्थ्याला विचारला, तर तो क्षणभर थांबेल आणि तुम्हाला परत प्रश्न विचारेल, कुठला स्वातंत्र्य दिन? भारत देशाचा, की गोवा राज्याचा? मित्रांनो, भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले, पण गोवा मात्र त्यावेळी पोर्तुगीजांच्या राजवटीमध्ये भरडला जात होता. तब्बल 14 वर्षांनी भारतीय सैन्याने गोव्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. आम्हा गोवेकरांनी भारतीय सेनेचे सहर्ष स्वागत केले. आम्ही त्यांना हे नाही विचारले की गोव्याचा भारतामध्ये समावेश करायला तुम्हाला इतकी वर्षे का लागली? असा प्रश्न न विचारण्याचे कारण होते – गोव्यात जरी पोर्तुगीजांची जुलमी राजवट असली तरी गोमंतकीयांच्या काळजात भारत माता होती. आज गोव्याचे वर्णन पूर्वेकडील रोम वगैरे शेलक्या शब्दात करून देतात.. त्यांनी हे ऐतिहासिक तथ्य जाणून घ्यावे. गोव्याची लोकसंख्या १४ लाख एवढी तर क्षेत्रफळ ३७०२ चौरस किलोमीटर एवढे आहे. म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यापेक्षा गोव्याचे क्षेत्रफळ मोठे नाही. पण सांगताना अभिमान वाटतो की संपूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त दरडोई उत्पन्न गोवेकराचे आहे. आज भारत देशात समान नागरी कायदा हा निवडणुकीचा विषय बनतो. पण गोव्यात हा कायदा सुरुवातीपासूनच अमलात आणलेला आहे.”

“गोव्यात महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकरांसारखे सुधारक, विचारवंत झाले नाहीत. पण गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी सनातन दुःखाच्या गहिऱ्या छायेत वावरणाऱ्या लोकांच्या उद्धाराचे स्वप्न पाहिले. ‘राहतो त्याचे घर’ व ‘कसेल त्याची जमीन’ हे कायदे अस्तित्वात आणले. एका किलोमीटर अंतरावर सरकारी प्राथमिक शाळा उघडल्या. ज्ञानाची गंगा लोकांच्या अंगणातून वाहू लागली. यासारख्या क्रांतिकारक पावलांमुळे भूमिपुत्र भूमीचा स्वामी बनला. निरक्षर साक्षर बनला. आज गोव्यात प्रत्येकाकडे घर आहे, जो कुणी रस्त्यावर झोपलेला आढळेल तर खुशाल समजावे की तो गोवेकर नाही. गोव्यातील शेतकऱ्यांनी कधीही कर्जबाजारी होऊन आत्महत्या केलेली नाही. देशांमध्ये शहरातील ‘इंडिया’ ग्रामीण भागातील ‘भारत’ला वाकुल्या दाखवतो. पण गोव्यात मात्र त्याचा योग्य समन्वय दिसून येतो. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हा मंत्र उभ्या देशाने उचलला असेल, पण त्याचा अर्थ कृतीत उतरवला तो मात्र गोमंतकीयाने.”

इथे आल्यानंतर आम्ही गोवेकर असं सांगितल्यावर हर्षभरित होऊन काहीजण गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याची वाहव्वा करतात, तर बरेच जण ‘ये बंदा गोवा का है..’ असे म्हणून आपल्या सभ्यतेचे दर्शन घडवतात. या गोष्टीची आम्हाला फिकीर नाही. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर माणसे किती कपडे घालतात, यापेक्षा प्रत्येकाकडे घालायला कपडे आहेत हे लक्षात घेणे जास्त गरजेचे. संबंध भारतामध्ये येणाऱ्या परदेशी प्रवाशांपैकी अधिकाधिक प्रवासी गोव्याला पसंती देतात याचे काय कारण असेल? इथले समुद्रकिनारे? नाही. यापेक्षा मोठी किनारपट्टी महाराष्ट्रातील कोकण भागाला लाभली आहे. ही माणसे इथे येण्याचे कारण – ‘अतिथी देवो भव.’ हे आमच्यासाठी केवळ सुभाषित नाही तर तो आमचा स्थायी भाव आहे. दुसऱ्यांच्या जीवन पद्धतीचा, संस्कृतीचा आदर कसा करावा हे गोवेकराकडून शिकावे. ख्रिश्चन धर्मप्रसाराच्या नावाखाली पोर्तुगीजांनी गोमंतकीयांचा छळ केला. हे मानवी इतिहासातील काळेकुट्ट पान आहे, पण या इतिहासाच्या ओझ्याखाली गोमंतकीयांचे मन कधीच गुदमरले नाही. त्यामुळे हिंदू- ख्रिश्चन या दोन धर्मियांमध्ये कधीही संघर्ष झाला नाही. उलट दोन्ही धर्मांनी एकमेकांवर प्रभाव पाडलेला दिसून येतो. याच कारणामुळे गोमंतकीय अधिक स्वागतशील, पुरोगामी, नव्या विचारांचा स्वीकार करणारा ठरला. दिव्य अज्ञानाच्या जोरावर गोव्याकडे बघून नाक मुरडणाऱ्यांनी गोव्याला भेट द्यावी. कपाळावर आठ्या चढवून संस्कृतीची चिंता वाहण्यापेक्षा माणूस केंद्रस्थानी ठेवून त्याला समृद्ध बनवणे हे आमचे ध्येय आहे. कारण समर्थ लोकांची संस्कृती टिकते.” 

भाषणानंतर वातावरण काहीसे बदललेले जाणवले. आता मात्र मला हलके हलके वाटायला लागले. याचा परिणाम समोरच्यांवरसुद्धा झाला असावा. कारण त्यानंतर ओरिसाच्या शिक्षकांनी आभार मानताना शिक्षकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. केंद्राच्या समन्वयकांनी ‘घे घे सायबा..’ हे कोकणी लोकगीतावरील फिल्मी गीत सादर केले. एकमेकांच्या प्रदेशाविषयी असा गंड बाळगून गैरवर्तन करणे आम्हाला शोभणारे नाही. उलट गैरसमजाच्या भिंती मोडण्यासाठीच आम्ही इथं आलो आहोत, अशा कानपिचक्या दिल्या. थोडक्यात काय, बाण नेमक्या जागी बसला होता. 

दुसरा दिवस रोजच्यासारखाच होता. फरक इतकाच की आदल्या दिवशीचा मी आज कुलदीपजी झालो होतो. त्या दिवशी संध्याकाळी चहानंतर आम्ही सर्व एकत्र बसलो. आता वातावरण खूपच वेगळे होते. सकाळच्या भाषणाचे बोलविते धनी मध्य प्रदेशचे शिक्षकही तिथे होते. आता मात्र ते अगदी मनमोकळ्या गप्पा मारत होते. बोलता बोलता जाणवले की तेथील शिक्षकांची स्थिती फारच बिकट आहे. आम्हाला सहावा वेतन आयोग पुरत नाही, पण त्यांना अजून पाचवा वेतन लागू झालेला नाही. मी पटकन विचारले, “तुम्ही आंदोलन का करत नाही?”

“मोर्चा काढला होता, माजी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकरवी दंडुक्याचा मार घातला. आणि वीस पंचवीस किलोमीटर दूर जंगलात नेऊन सोडले.” तेवढ्यात दुसरा म्हणाला, “आमच्या या आंदोलनाला समाजाचाच पाठिंबा नाही. लोक म्हणतात, तुम्हाला पगार कमी पडतो ना, मग सोडा नोकरी, आम्ही आमच्या मुलाला तिथे चिकटवतो. परिस्थिती इतकी बिकट आहे की जर सरकारने अशी योजना आखली की ज्यात लोकांनी लाखभर रुपये सरकारला देऊन दोन वर्षांपर्यंत विनापगार नोकरी करू द्यायची आणि नंतर कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घ्यायचं, तरी झुंबड उडेल.” तितक्यात तंबाखू मळणारा आणखी एक शिक्षक तंबाखू तोंडात टाकून म्हणाला, “वर्षाला तर वेगवेगळ्या तीन-चार निवडणुकीच्या ड्युट्या कराव्या लागतात.” हे ऐकल्यावर आणखी एक प्रश्न पडलाः भारत महासत्ता की नुसत्याच बाता!!

या दहा दिवसात राजस्थानमधील एका विज्ञान शिक्षकाने आम्हा सगळ्यांचे छान मनोरंजन केले. ते म्हणाले, “मी फक्त जून-जुलै महिन्यातच माझा सगळा पोर्शन संपवतो आणि सबंध वर्ष वेगवेगळ्या प्रकारचे सेमिनार करत हिंडत असतो.” मी विचारले, “मग मुख्याध्यापक…”, मला मध्येच तोडत म्हणाला, “मी अध्यापक संघटना का अध्यक्ष हूँ!” म्हणजे काय समजायचे ते समजा. पश्चिम बंगालच्या दोन शिक्षकांशी चांगली मैत्री झाली होती. ते म्हणाले, “कम्युनिस्ट पैसे खात नाही असे तुम्ही म्हणता. आता खाण्यासाठी राहिले काय? शाळेमध्ये पक्षाचा नको तितका हस्तक्षेप असतो. सुरुवातीचा काही महिन्यांचा पगार तर पार्टी फंडला द्यावा लागतो. इथे इंग्रजी शिक्षणाला मज्जाव करतात, त्यांचीच पोरं मात्र अमेरिकेत उच्च शिक्षण घेतात.” ‘मायभास जाय’ म्हणणारे व स्वतःच्या पोरांना कॉन्व्हेंटमध्ये पाठवणारे गोव्याचे संस्कृतीप्रेमी मला आठवले. पश्चिम बंगालच्या ग्रुपचा कार्यक्रम अप्रतिम होता. गुवाहाटीतील लोककला आणि सादर केलेले बिहू नृत्य खऱ्या अर्थाने डोळ्याचे पारणे फेडणारे होते. 

गुवाहाटीतील काही प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घेऊन आम्ही गोव्याकडे प्रस्थान केले. गोव्याला आल्यानंतर संपूर्ण अनुभवातून जे जाणवलं ते म्हणजे आम्ही गोवेकर किती सुदैवी आहोत हे!. आमच्या कार्यशाळेचा विषय होता ‘देशाची सांस्कृतिक विविधता’. पण येथे अनेक जणांशी संवाद साधल्यानंतर समजले की आपल्या देशातील समस्या ही सांस्कृतिक नसून आर्थिक आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कामगार संघटनेचे पुढारी शरद जोशी यांनी ‘जातीय दंगलीचे रसायनशास्त्र कसे बनते’ या लेखात याची मीमांसा केली आहे. त्यांच्या मते कुठल्याही दंगलीमागे आर्थिक प्रक्षोभ असतो. ते समजून घेण्याची कुवत आपल्यामध्ये नसते. यासाठी हे प्रश्न कधी भाषा, प्रांत, धर्म अस्मितेच्या नावाने व्यक्त होत असतो. त्यामुळे संस्कृती समृद्ध करण्याचा खटाटोप करण्यापेक्षा माणूस आर्थिक दृष्ट्या बळकट करण्यात अर्थ आहे. देश म्हणजे हिमालय, ताजमहल किंवा समुद्रकिनारे नव्हे. आपला देश म्हणजे इथे राहणारी माणसं. या माणसांना भेटण्याची संधी या आसामवारीमुळे प्राप्त झाली. ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव.. ही प्रतिज्ञा शाळेत कित्येकदा म्हटली, पण इथे त्याचा अर्थ गवसला.

Your email address will not be published. Required fields are marked *