रस्ता व्यवस्थापन: ओपन फोरमच्या निमित्ताने

गोव्यातील रस्त्यांवर मोठ्या संख्येने होणारे अपघात आणि अपघाती मृत्यू ही सुशिक्षित आणि सुसंस्कृत गोमन्तकीयांसाठी निश्चितच चिंताजनक आणि लाजिरवाणी बाब आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात अपघात आणि अपघाती मृत्युंच्या बाबतीत आपला गोवा मागची अनेक वर्षे देशात आघाडीवर आहे. अंदाजे सोळा लाख लोकसंख्येच्या आपल्या राज्यात मागच्या पाच वर्षात सरासरी 270 लोकाना अपघाताती मृत्यू आला. अपघातांचे आणि मृत्यूंचे प्रमाण कमी होण्या ऐवजी दर वर्षी ते वाढत आहे ही चिंतेची बाब आहे.

या अनुशंगाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी नुकताच सार्वजनिक बांधकाम खाते, वाहतुक खाते आणि रस्ता व्यवस्थापनाकडे निगडित जनतेचा जाहीर संवाद घडवून आणला. या संबंधी नागरिकांनी केलेल्या सुचनांचा अहवाल तयार करून 1 डिसेंबर पासून त्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी यावेळी जाहीर केले आहे.

केवळ 3702 चौरस किलोमिटर क्षेत्रफळ असलेल्या गोव्याची जनसंख्या जवळपास सोळा लाखाच्या घरात आहे. राज्यात 1541834 वाहनांची नोंदणी झालेली आहे. म्हणजेच जवळजवळ दरडोई एक वाहन असे हे प्रमाण आहे. या शिवाय पर्यटकांची हजारो वाहने गोव्याच्या रस्त्यांवर धावत असतात. रस्त्यावरील वाहनांच्या संख्येचा विचार केल्यास गोव्याच्या रस्त्यांची लांबी आणि रुंदी कमी आहे. गोव्यात वाहनांची संख्या दर वर्षीं 3.7 इतक्या टक्केवारीने वाढत असते तर रस्त्यांची लांबी आणि रुंदी तीच आहे. राज्यातील हमरस्त्याची लांबी 293.10 किलोमीटर इतकी आहे. जवळ जवळ चाळीस टक्के अपघात हमरस्त्यांवर घडत असतात. या अपघाताना जितके वाहन चालक जबाबदार असतात तितकेच सार्वजनिक बांधकाम खातेही जबाबदार आहे. रस्त्याच्या रुंदीकरण किंवा नवीन हमरस्त्याचे काम चालू असलेल्या ठिकाणी योग्य सुचना फलकांचा अभाव तसेच खोदलेल्या रस्त्याची वेळेत डागडुजी न करणे किंवा रस्त्याच्या बांधकाम प्रक्रियेत दोष ठेवल्याने विशेषता पेडणे सारख्या तालुक्यांत अनेक अपघात घडलेले आहेत.

गोव्यात 2021 साली 2849 अपघातांची नोंद झाली होती तर 2022 वर्षाच्या सप्टेबर महिन्याच्या शेवट पर्यंत 2244 इतके अपघात नोंद झालेले आहेत. 2021 या वर्षातील रस्ता अपघातातील मृत्यूंची संख्या होती 218 तर या वर्षीच्या सप्टेबर पर्यंत ती 195 आहे. या आकडेवारी वरून या वर्षीची अपघात आणि मृत्यूंची दाहकता लक्षात येईल. दर वर्षी अपघातांची संख्या सुमारे 13 टक्क्यांनी तर अपघाती मृत्यूंची संख्या 21 टक्क्यांनी वाढत आहे. आपल्या छोट्याश्या राज्यासाठी हे अशोभनिय आहे.

या वर्षी सप्टेबर पर्यंत दुचाकी अपघातांत मृत्यू आलेल्या 152 पैकी 109 जणांनी वाहन चालवताना हेल्मेट परिधान केले नव्हते असे आढळून आलेले आहे. यावरून अपघातांसाठी फक्त शासनालाच दोष देवून चालणार नाही असे म्हणावे लागेल.

गोव्यातील बहुतेक अपघात हे वेर्णा, फोंडा, पर्वरी, ओल्ड गोवा तसेच पेडणे या भागात होत असतात. या रस्त्यांवर रहदारी मोठ्या संख्येने असते. या भागांतील महत्वाच्या रस्त्यांवर इतर छोटे- मोठे रस्ते येवून मिळतात त्यामुळे वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत जाते. उदाहरणार्थ, गोव्यातील अपघातांचे प्रमूख केंद्र असलेल्या वेर्णा रस्त्याला औद्योगिक वसाहत, दाबोळी विमानतळ रस्ता असे महत्वाचे रस्ते येवून मिळतात आणि रस्त्यावरील ताण वाढत जातो. त्यामुळेच या रस्त्यांवर बऱ्याचदा रहदारीची कोंडी होत असते आणि या कारणाने वाहने बेशिस्तीने तसेच निश्काळजीपणे हाकणे हे नेहमीचेच झालेले आहे. गोव्यातील बहुतेक अपघात हे संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान घडून येतात. कामावरून लोकांचा घरी जाण्याचा हा वेळ. दिवसभराच्या कामातून कधी एकदाचा घरी पोहोचायची घाई लोकांना झालेली असते. अश्यावेळी थोडासा संयम बाळगून वाहन योग्य गतीने आणि जबाबदारीने हाकल्यास अपघात टाळता येतील.

गोव्यात रहदारी पुलीसांची संख्या खूपच कमी आहे. गोव्यात सरासरी दीड ते दोन हजार वाहनांच्या मागे एक रहदारी पुलीस असे प्रमाण आहे. त्यामुळे रस्ता व्यवस्थापनावर पाहिजे तितके लक्ष दिले जात नाही.

रहदारी पुलीसांनी मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना दंड देण्याबरोबरच त्यांना रस्त्यावरील जबाबदारींची आणि नियमांची ओळख करून देण्यास प्राधान्य दिले पाहिजे. अटल सेतूवर दोन चाकी वाहनांना बंदी आहे. विशेषता पर्यटकांना त्याची कल्पना नसल्यामुळे बरेच पर्यटक दुचाकीवरून अटल सेतूवरून प्रवास करतात. त्यांच्या स्वागतासाठी पुलाच्या दुसऱ्या बाजूला रहदारी पुलीस तत्पर असतात. अश्या वेळी पुलाच्या दुसऱ्या बाजुला उभे राहून त्याना दंड ठोठावण्या ऐवजी पुलाच्या प्रवेशावरच थांबून त्याना नियमाची कल्पना देता येते. एखाद्या ठिकाणी रहदारी पुलीस उभे असल्यास आणि दुसऱ्या बाजूने एकादा विना हेल्मेटधारी दुचाकीस्वार येत असल्यास आमचीही समाजसेवा वृत्ती उफाळून येते आणि आपण विरूद्ध दिशेने येणाऱ्याला लायट दाखवून किंवा डोक्याला हात लावून इशारा करतो आणि पुढे पुलीस असल्याची त्याना कल्पना देतो. चुकीसाठी दंड भरावा लागणार तेव्हा ती चूक परत न करण्याची भावना त्याच्यात तयार होणार हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

गोव्यात एकूण 27 ब्लॅक स्पॉट असून संबंधीत खात्याकडून त्यापैकी 11 ब्लॅक स्पॉटमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. 12 ब्लॅक स्पॉट मध्ये रस्ता रुंदीकरणासाठी गरजेच्या प्रक्रियेमुळे विलंब झाल्याचे बांधाकम मंत्री निलेश काब्राल यांचे म्हणणे आहे. रस्ता रुंदीकरणासाठी लोकांची जमीन संपादित करायची असल्यास त्याना त्यासाठी तयार करणे, त्याना योग्य ती भरपाई देणे गरजेचे आहे. गरज भासल्यास समाजाचे हित डोळ्यांसमोर ठेवून शासनाने कायद्याचा आधार घेवून भुसंपादन करणे रास्त आहे. त्यासाठी आपले राजकिय हितसंबंध पुढाऱ्यांनी बाजुला ठेवणे महत्वाचे आहे. 27 पैकी 16 ब्लॅक स्पॉट दिर्घ काळ प्रलंबित आहेत ही खेदाची गोष्ट आहे.

गोव्यात जिल्हा पातळीवर दोन तसेच राज्य स्थरावर एक अश्या रस्ता व्यवस्थापन समित्या कार्यरत आहेत. त्याशिवाय प्रत्येक पंचायतीमध्ये रस्ता सुरक्षा आणि रहदारी व्यवस्थापन समिती स्थापन करणे कायद्यान्वये गरजेचे आहे. या समित्या फक्त कागदावर राहता कामा नये. रहदारी पुलीसांनी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी जमा केलेल्या दंडाची अर्धी रक्कम ही नागरिकाना रहदारी कायदा आणि कर्तवे यांची जाणिव करून देण्यासाठी वापरण्यात यावा अशी कायद्यातील तरतूद आहे. त्या दृष्टीने माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक स्थरावर विद्यालयांत शासनाने खास जागृती वर्गांची आखणी करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शिक्षीत केल्यास त्यांच्या माध्यमातून घरात तसेच परिसरात मार्ग संस्कृती रुजविणे शक्य आहे. मार्ग ट्रस्ट ह्या रस्ता व्यवस्थापनाशी निगडित सेवाभावी संस्थेने हा प्रयोग काही निवडक शाळांमध्ये यशस्वीपणे राबविलेला आहे.

रस्ता अपघातात मृत्यू आलेल्या व्यक्तीच्या अवलंबिताना विम्याची रक्कम मिळण्याची तरतूद आहे. बहुतेक नागरिकांना त्याची कल्पना नसते. शासनाने स्वताचे अधिकारी अश्या लोकांच्या घरी पाठवून त्याना या योजनेचा फायदा करून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

इंग्रजीत एक म्हण आहे, ‘बॅटर लेट दॅन नेव्हर’. उशिरा का असेना, शासनाला रस्ता अपघातांच्या गांभिर्याची ओळख झालेली आहे. पण रस्ता व्यवस्थापनात महत्वाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते शासकिय अधिकारी या बाबतीत गंभीर आहेत का हा प्रश्न आहे. जोपर्यंत संवेदनशील आणि जबाबदार नागरिक आणि समाजसेवी संस्था सातत्याने आणि प्रामाणिकपणे काम करणार नाहीत आणि वाहन चालक स्वताला शिस्त लावून घेणार नाहीत तो पर्यंत अपघात घडत राहणार आणि लोक फडफडत मरत राहणार. मागे राहिलेले आप्तेष्ट काही दिवस कळवळणार, रास्ता रोको करणार आणि मग आहे तसेच पुढे चालू राहणार. ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ या उक्ती प्रमाणे!

Your email address will not be published. Required fields are marked *